leopard attack : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात परळे निनाई येथील कडवी धरणाच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची भीषण घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये निनो कंक (वय 75) आणि रुक्मिणीबाई कंक (वय 70) यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
बिबट्याने मृतदेह थेट धरणाच्या पाण्याजवळ फरफटत नेला
मिळालेल्या माहितीनुसार, निनो आणि रुक्मिणीबाई कंक हे दाम्पत्य परळे निनाई गावाच्या हद्दीत कडवी धरणाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. या शेडमध्ये ते शेळीपालनाचा व्यवसाय करत होते. शनिवारी (दि. 18 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास दोघे झोपलेले असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ला इतका भयंकर होता की बिबट्याने दोघांनाही घराबाहेर ओढत नेत निर्दयीपणे फाडफाडून ठार केलं. निनो कंक यांना तर बिबट्याने थेट धरणाच्या पाण्याजवळ फरफटत नेलं, तर रुक्मिणीबाईंचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
रविवारी सकाळी ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ शाहूवाडी पोलिसांना आणि वनविभागाला कळवले. शाहूवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम आणि पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. तपासादरम्यान घटनास्थळी बिबट्यासदृश प्राण्याचे ठसे आढळून आले असून हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे प्राथमिक निष्कर्ष वनविभागाने नोंदवले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गावकऱ्यांमध्येही या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत. काहींचं म्हणणं आहे की परिसरात बिबट्याचा वावर गेल्या काही दिवसांपासून वाढला होता, मात्र वनविभागाने याबाबत योग्य वेळी उपाययोजना केली नाही.
दोन्ही मृतदेहांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आलं. या दुर्दैवी घटनेनंतर परळे निनाई आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भितीचं वातावरण आहे. जंगलालगत राहणाऱ्या लोकांमध्ये आता बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचं सावट गडद झालं आहे. वनविभागाने तत्काळ परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा शोध सुरू केला असून या घटनेमुळे पुन्हा एकदा माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचं वास्तव अधोरेखित झालं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
