Gadchiroli News: गडचिरोलीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे प्रसूतीसाठी बाहेरगावी एका गर्भवती महिलेने 6 किमी पायपीट केल्याने तिचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. गावात प्रसूतीची सोय नसल्याकारणाने तिला तिच्या बहिणीच्या गावी जाण्यासाठी पतीसोबत जंगलमार्गाने 6 किमी पायी जावं लागलं. दरम्यान, पहाटे तिला लेबर पेन सुरू झाल्याने तिला रुग्णवाहिकेतून हेडरी येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, आधी बाळाचा आणि नंतर काही वेळातच पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
गावात प्रसूतीसाठी सुविधा नाही...
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचं नाव आशा संतोष किरंगा (24) असून ती गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला गावातील रहिवासी होती. तिचं गाव हे तालुक्यातील मेन रोडपासून 6 किमी अंतरावर असून तिथे प्रसूतीसाठी कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे, पीडिता 9 महिन्यांची गर्भवती असल्याकारणाने ती 1 जानेवारी रोजी आपल्या पतीसोबत जंगलमार्गाने 6 किमी पायपीट करत आपल्या बहिणीच्या गावात जाण्यासाठी निघाली.
हे ही वाचा: दिवगंत मनसे नेते रमेश वांजळेंची कन्या पुणे मनपा निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत उमेदवार, संपत्ती किती?
आधी बाळाचा अन् नंतर पीडितेचा मृत्यू
त्यानंतर, 2 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास तिला प्रसववेदना सुरू झाल्या आणि तिला त्वरीत अॅम्ब्युलन्समधून हेडरी येथील रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी, डॉक्टरांनी सिझेरिअन ऑपरेशन करून गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला. परंतु, बाळाचा आधीच गर्भात मृत्यू झाला होता आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे काही वेळातच महिलेचा सुद्धा मृत्यू झाला.
हे ही वाचा: भरदिवसा मनसे नेत्याची हत्या, बिनविरोध निवडणूक होण्यासाठी वाद अन् धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं
गडचिरोली जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा सेविकांच्या माध्यमातून पीडित महिलेची नोंदणी करण्यात आली होती. अचानक लेबर पेन आणि 6 किमी पायपीट केल्याने तिच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु यश आलं नाही. तालुका अधिकाऱ्यांकडून संबंधित घटनेचा अहवाल मागवण्यात आला असून प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











