Washim Crime | ज़का खान : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांमुळे यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे. त्यातच आता वाशिम जिल्ह्यातील कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भयावह प्रकार घडला. काजळेश्वर गावाजवळ एका पुलाखाली 20 वर्षीय मतिमंद युवती माया कोड़ापे हिचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला. या घटनेनं अख्खा परिसर हादरला.
ADVERTISEMENT
गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनी मृतदेह पाहिल्यावर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच युवतीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला, तिचं डोकं चिरडलेलं होतं. तिच्या मृतदेहाजवळ चपात्या आणि भाजी आढळली. त्यावरुन ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचं दिसतंय.
हे ही वाचा >> कुणी चहा घेत होतं, कुणी गप्पा मारत होतं... कार आली आणि सर्वांना चिरडून गेली, सदाशिव पेठेत काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, माया ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तीन दिवसांपूर्वी ती रात्री रस्त्यावर भटकताना आढळली होती, तेव्हा स्थानिकांनी तिला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवलं होतं. त्यानंतर ही हत्येची घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आला, तेव्हा मायाचे कुटुंबीय आणि आदिवासी समाजाचे अनेक लोक तिथे जमले. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मायासोबत बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
हे ही वाचा >> शरीर संबंधाला विरोध, वादानंतर संतापलेल्या पत्नीने अंगावर रॉकेल ओतलं, पतीने थेट गॅसवरुन...
वाशिमचे एसपी अनुज तारे यांनी सांगितलं की, घटनास्थळावरून फॉरेंसिक पुरावे गोळा करण्यात आले असून, दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतर बलात्काराची पुष्टी होऊ शकेल. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास तीव्र केला आहे.
ADVERTISEMENT
