Bank Of Baroda Recruitment : बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने देशभरात तब्बल 1100 रिक्त जागा भरण्यासाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत 'वेल्थ एक्झिक्युटिव' (Wealth Executive) पदाच्या 1000 जागा आणि 'क्रेडिट अॅनालिस्ट-C & IC' (Credit Analyst-C & IC) पदाच्या 100 जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पात्रतेचे निकष काय?
या भरतीसाठी पदांनुसार स्वतंत्र शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट ठेवण्यात आली आहे. वेल्थ एक्झिक्युटिव या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे, तसेच त्याच्याकडे IC-38, NISM Series V-A, XXI-A किंवा V-D यापैकी किमान एक प्रमाणपत्र असणे आणि संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे. दुसरीकडे, क्रेडिट अॅनालिस्ट पदासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीसह चार्टर्ड अकाउंटंट (CA) पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. या पात्रता निकषांची पूर्तता करणारे उमेदवारच या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.
हे ही वाचा : निवडणूक आयोगात नेमकं चाललंय तरी काय? मोठी खळबळ अन् आता 'ते' पत्रक!
आकर्षक वेतन आणि भत्ते
उमेदवारांच्या वयाचा विचार करता 1 सप्टेंबर 2026 रोजी वेल्थ एक्झिक्युटिव पदासाठी वयोमर्यादा 22 ते 32 वर्षे, तर क्रेडिट अॅनालिस्टसाठी 21 ते 33 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. यात सरकारी नियमांनुसार एससी व एसटी प्रवर्गाला 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गाला 3 वर्षांची सूट मिळणार आहे. या भरतीसाठी खुला, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये, तर एससी, एसटी, दिव्यांग आणि महिलांसाठी 175 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना जेएमजी/एस-1 आणि एमएमजी/एस-2 श्रेणीनुसार साधारण 48,480 ते 93,960 रुपयांपर्यंतचे आकर्षक वेतनमान आणि भत्ते दिले जाणार आहेत.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची निर्दोष मुक्तता, 'त्या' प्रकरणात न्यायालयाचा 17 वर्षांनंतर मोठा निर्णय
'असा' करा अर्ज
बँक ऑफ बडोदाची ही भरती संपूर्ण भारतासाठी असून, निवड झाल्यानंतर उमेदवारांना देशात कुठेही काम करण्याची संधी मिळू शकते. बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवू पाहणाऱ्या आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी 1 ऑक्टोबर या शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून (bankofbaroda.bank.in) आपले ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
ADVERTISEMENT












