High Court dismisses petition against Hyderabad Gazetteer : हैद्राबाद गॅझेटीअर लागू करण्यात यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सप्टेंबर महिन्यात मोठं आंदोलन केलं होतं. मनोज जरांगेंच्या 5 दिवसांच्या उपोषणानंतर सरकारने हैद्राबाद गॅझेटीअर लागू करण्यास मान्यता दिली होती. सरकारने या संदर्भात तातडीने जीआर देखील काढले. हैद्राबाद गॅझेटीअरनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या शासन निर्णयावरोधात ओबीसी संघटनांसह अन्य काही लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी आज (दि.7) हायकोर्टात सुनावणी पार पडली. सरकारकडून 2 सप्टेंबर रोजी जारी केलेला शासन निर्णयास अंतरिम स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र, हायकोर्टाने हैद्राबाद गॅझेटीअर विरोधातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालाय.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेला जीआर असंविधानिक आहे, तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र, हायकोर्टाने हा शासन निर्णय रद्द करण्यास नकार दिलाय.
दरम्यान, हैद्राबाद गॅझेटीअर सोबतच सातारा गॅझेटीअर लागू करण्यात यावं, अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली होती. मात्र, उपोषण सोडताना मनोज जरांगे यांनी सातारा गॅझेटीअर लागू करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता.
हैद्राबाद गॅझेटीअर काय आहे?
हैदराबाद गॅझेट हा 1918 मध्ये निझामांच्या काळात प्रसिद्ध झालेला एक अत्यंत महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज मानला जातो. त्या काळात संस्थानातील बहुसंख्य मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये अन्याय सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर निजाम सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो अधिकृत गॅझेटद्वारे प्रसिद्ध केला. त्यामुळे त्याला "हैदराबाद गॅझेट" असे नाव देण्यात आले. या गॅझेटमध्ये मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित नोंदी नमूद आहेत. 1901 च्या जनगणनेनुसार, या दस्तऐवजात मराठा आणि कुणबी या दोन्ही समाजांना एकच असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्या वेळी मराठवाड्यातील मराठा-कुणबी लोकसंख्या सुमारे 36 टक्के होती, तर कुणबी जातीची लोकसंख्या 46,10,778 इतकी नोंदवली गेली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या गॅझेटचा ऐतिहासिक पुरावा म्हणून उल्लेख केला जातो. शासकीय नोंदवहीत मराठा समाज मागासवर्गीय असल्याचे दाखले या गॅझेटमधून मिळतात. सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार (जीआर), हैदराबाद गॅझेटियरमधील या नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.
हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर मनोज जरांगे काय म्हणाले?
माननीय न्याय देवतेने मराठ्यांना आधार देण्याचं काम केलं आहे. गोर-गरिबांचा कोणी आधार नसतो, त्यावेळी न्यायदेवता गरिबांना आधार देते. कोणीही कितीही विरोध केला तरी जीआरला काहीच होऊ शकत नाही. मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून छगन भुजबळ यांनी काम सुरु केलंय. आता जळणारे असतेत, त्यांना इलाज नाही. मी सरकारचं अभिनंदन करतो. न्याय देवता कोणच्या इच्छेवर चालत नाही. न्यायदेवतेने न्याय दिलाय. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सरकारची आहे. देवेंद्र फडणीस, शिंदे साहेब आणि विखे पाटील साहेब यांचे आभार मानतो. सातारा-कोल्हापूर गॅझेटीअर सुद्धा लवकरच लागू होईल, अशी आशा आहे. मराठवाड्यातील सर्व मराठे आरक्षणात जाणार आहेत, कोणी चिंता करायची नाही. मराठ्यांचा जीआर पक्का आहे, म्हणूनच छगन भुजबळ सारखे नेते अस्वस्थ झाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
