गिलच्या मागणीला आयसीसीची नकारघंटा; बॉलवर लाळ लावण्यावरील बंदी कायम राहणार!

अजित बायस

• 10:40 AM • 26 Nov 2026

वेलिंग्टन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी हटवण्याची मागणी केली होती. मात्र, आरोग्य आणि खेळातील निष्पक्षतेचं कारण देत आयसीसीने अवघ्या 24 तासांत ही मागणी फेटाळून लावली आहे.

ICC rejects shubman gill plea to lift saliva ban in international cricket

ICC rejects shubman gill plea to lift saliva ban in international cricket

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कसोटी क्रिकेटमध्ये लाळेचं महत्त्व काय?

point

आयसीसी बंदी उठवण्यास तयार का नाही?

ICC Saliva Ban, वेलिंग्टन: कसोटी क्रिकेटच्या पाचव्या दिवशी समोरचा संघ दडपणाखाली असतो, पण खेळपट्टी गोलंदाजांना कोणतीही साथ देत नाही आणि चेंडूही लवकर मऊ पडतो... अशा वेळी एखाद्या कर्णधाराची हतबलता किती टोकाला जाऊ शकते, याचा प्रत्यय वेलिंग्टन कसोटीनंतर आला. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एका जुन्या नियमावर बोट ठेवलं. "कोविडचा काळ संपून आता वर्षे लोटली आहेत, तरीही चेंडू चमकवण्यासाठी लाळ लावायला परवानगी का नाही?" असा थेट सवाल गिलने केला. मात्र, भारतीय कर्णधाराच्या या मागणीला 24 तासांतच आयसीसीकडून नकारघंटा मिळाली असून, या बंदीचा पुनर्विचार करण्याचा कोणताही इरादा नसल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

वेलिंग्टनचा अनिर्णित सामना आणि गिलची नाराजी

वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने अखेरच्या दिवशी 2 बाद 119 वरून खेळ सुरू करत 5 बाद 239 धावांपर्यंत मजल मारली. डॅरिल मिचेलने (187 चेंडूंत नाबाद 49) आणि ग्लेन फिलिप्सने (126 चेंडूंत नाबाद 26) भारतीय गोलंदाजांना दिवसभर झुंजवत ठेवलं. अखेर दोन्ही कर्णधारांच्या संमतीने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. 2015 नंतर या मैदानावर झालेल्या 15 कसोटी सामन्यांतील हा केवळ दुसराच अनिर्णित सामना ठरला.

वेलिंग्टन कसोटी अनिर्णित सुटल्यामुळे भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शक्यता जवळपास मावळल्या आहेत. ऑगस्टमध्ये कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताचा हा सलग दुसरा अनिर्णित कसोटी सामना ठरला. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आता भारताला आपल्या उर्वरित 6 कसोटी सामन्यांमध्ये विजय तर मिळवावाच लागेल, शिवाय त्यानंतर देखील इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.  

हे ही वाचा>> घटस्फोटावेळचा 'तो' टी-शर्ट पाठ सोडेना; प्रियांका चतुर्वेदींच्या 'गुगली'वर युजवेंद्र चहल क्लीन बोल्ड!

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार शुभमन गिलने आपली नाराजी लपवली नाही. "आजकाल कसोटी सामने अनिर्णित राहणं दुर्मिळ झालं आहे, आम्हाला त्याची सवय नाही. कुकाबुरा चेंडू खूप लवकर मऊ पडला आणि खेळपट्टीवरून कोणतीही मदत मिळत नव्हती. अशा वेळी चेंडू चमकवण्यासाठी लाळ लावण्यास अजूनही का बंदी आहे, हे मला समजत नाही," अशा शब्दांत गिलने आपली खदखद व्यक्त केली.

कसोटी क्रिकेटमध्ये लाळेचं महत्त्व काय?

कसोटी क्रिकेटमध्ये लाल चेंडूचा वापर दीर्घकाळ केला जातो. वेगवान गोलंदाज चेंडूची एक बाजू घाम आणि लाळेच्या मदतीने चमकदार ठेवतात, तर दुसरी बाजू खरखरीत होऊ देतात. दोन्ही बाजूंमधील या फरकामुळेच चेंडू हवेत 'स्विंग' आणि जुना झाल्यावर 'रिव्हर्स स्विंग' होतो. कोरड्या किंवा फलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर रिव्हर्स स्विंग हे गोलंदाजांसाठी सर्वात मोठं अस्त्र मानलं जातं. 

मात्र, मे 2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने लाळेच्या वापरावर तात्पुरती बंदी घातली होती आणि केवळ घामाचा वापर करण्याची मुभा दिली होती. पुढे सप्टेंबर 2022 मध्ये ही बंदी कायमस्वरूपी करण्यात आली. विशेष म्हणजे, आयपीएलने (IPL) 2025 च्या हंगामापूर्वीच ही बंदी हटवली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हा नियम शिथिल केला जाईल, अशी अपेक्षा अनेकांना होती.

आयसीसी बंदी उठवण्यास तयार का नाही?

गिलच्या मागणीनंतरही आयसीसीने हा नियम बदलण्याचे कोणतेही तातडीचे संकेत दिलेले नाहीत. आयसीसीच्या एका सूत्राने 'इंडिया टुडे'ला दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य आणि खेळातील निष्पक्षता या दोन्ही कारणांमुळे ही बंदी कायम ठेवण्याच्या भूमिकेवर आयसीसी ठाम आहे.

लाळेचा वापर कसा केला जातो, यावर नियंत्रण ठेवणं कठीण असल्याचंही आयसीसीचं म्हणणं आहे. खेळाडू लाळेसोबत मिठाई, च्युइंग गम किंवा मिंटसारख्या पदार्थांचा वापर करून चेंडूची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा प्रकारच्या कृतींवर लक्ष ठेवणं आणि त्यांचं नियमन करणं आव्हानात्मक ठरू शकतं. याशिवाय, लाळेमुळे खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशीही आयसीसीची भूमिका आहे. त्यामुळे केवळ कोरोना महामारी संपली म्हणून हा नियम रद्द करणं योग्य ठरणार नाही, असं आयसीसीचं म्हणणं असल्याचं वृत्त आहे.

हे ही वाचा>> हा वैभव सूर्यवंशी कहरच आहे, बाकी काही नाही... अवघ्या 52 चेंडूत ठोकल्या 200 धावा!

नियम बदलायचा असेल तर प्रक्रिया काय?

आयसीसीच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी सदस्य देशांपैकी एखाद्या सदस्याने संबंधित समितीसमोर प्रस्ताव मांडणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या प्रस्तावाचा विचार करून तो आयसीसी बोर्डापर्यंत जाऊ शकतो. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला बाली येथे झालेल्या आयसीसी बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचे कोणतेही संकेत नसल्याचंही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे गिलने उपस्थित केलेला मुद्दा क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला असला, तरी लगेच नियम बदलण्याची शक्यता दिसत नाही.

एकंदरीत, फलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर आणि मऊ पडणाऱ्या चेंडूंमुळे गोलंदाजांची होणारी कोंडी शुभमन गिलने जगासमोर मांडली आहे. मात्र, आयसीसीने तूर्तास तरी 'नो' म्हटल्याने, आगामी सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांना लाळेच्या मदतीशिवायच प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करण्याचे नवे मार्ग शोधावे लागणार आहेत.