कल्याण: महाराष्ट्रातील कल्याण पश्चिममधून भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, बिर्ला कॉलेज रोड परिसरासह शहरातील काही भागांमध्ये भटक्या कुत्र्यांनी मोठ्या संख्येने नागरिकांवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. रविवार दुपारपासून सोमवार दुपारपर्यंत 24 तासांच्या कालावधीत 161 हून अधिक जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
या घटनेमुळे कल्याणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
खडकपाडा, बिर्ला कॉलेज रोडसह अनेक भाग प्रभावित
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, बिर्ला कॉलेज रोड, जुन्या RTO कार्यालयाच्या आसपासचा परिसर आणि भोईरवाडी हे भाग सर्वाधिक प्रभावित असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा>> तुकाराम मुंढेंचा हॉटेल्सवर ‘सर्जिकल स्ट्राइक’! कुठे झुरळांचा सुळसुळाट तर कुठे किचनशेजारी टॉयलेट!
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भटक्या कुत्र्यांचे कळप रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या मागे धावत होते. बाइकस्वार आणि रिक्षाचालकांचाही पाठलाग केला जात होता. संधी मिळताच नागरिकांना कुत्रे चावा घेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
11 वर्षांची मुलगी गंभीर जखमी
या हल्ल्यांमध्ये 11 वर्षांची एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सुरुवातीला उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्येही चिंता वाढली आहे.
रुक्मिणीबाई रुग्णालयात डॉग बाइटच्या रुग्णांची गर्दी
कल्याणमधील KDMCच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात डॉग बाइटच्या रुग्णांची मोठी गर्दी झाली. रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलक्षणा त्रिभुवन यांच्या माहितीनुसार, रविवार उशिरापर्यंत 58 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर सोमवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणखी 103 रुग्णांची नोंद झाली. यातील काही नागरिकांनी खासगी रुग्णालयांमध्येही उपचार घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा>> फक्त 6 दिवस शिल्लक... तुम्हाला पुन्हा LPG सिलेंडर मिळणार नाही! ताबडतोब करा 'हे' काम
KDMC प्रशासन अखेर लागले कामाला
घटनेची गंभीरता लक्षात आल्यानंतर KDMC प्रशासनही सक्रिय झाले. KDMC आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर हर्षाली थविल चौधरी यांनी पत्रीपूल येथील डॉग स्टेरिलायझेशन आणि व्हॅक्सीनेशन सेंटरची पाहणी केली.
महापौरांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने रात्रीपासूनच कुत्र्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच नसबंदी आणि लसीकरणाची प्रक्रिया वेगाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विरोधकांचाही प्रशासनावर हल्लाबोल
या घटनेवरून विरोधकांनीही KDMC प्रशासनाला लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाचे नेते उमेश बोरगांवकर यांनी एवढी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणे ही लाजिरवाणी बाब असल्याची टीका केली. तसेच महानगरपालिकेकडे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर ठोस योजना नसल्याचा आरोप त्यांनी केला.
24 तासांत 161 हून अधिक जणांना चावा; प्रश्न गंभीर
कल्याणमध्ये अवघ्या 24 तासांत 161 हून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचा दावा, त्यात 11 वर्षांच्या मुलीची गंभीर दुखापत आणि रुग्णालयात डॉग बाइटच्या रुग्णांची वाढलेली संख्या या सगळ्या घटनांमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT












