भिडे वाड्याची संकल्पना, फुले दाम्पत्याचा संघर्ष; म्हारळच्या सरपंचांचा बाप्पासाठी खास देखावा

मुंबई तक

• 08:40 PM • 23 Sep 2026

कल्याण तालुक्यातील म्हारळच्या सरपंच निलिमा नंदू म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी गणपतीच्या देखाव्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणासाठीच्या कार्याचा गौरव केला आहे.

kalyan mharal sarpanch nilima mhatre ganpati decoration savitribai phule womens education

Ganeshotsav 2026

Google CTA

कल्याण: कल्याण तालुक्यातील म्हारळच्या सरपंच निलिमा नंदू म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या सजावटीतून भिडे वाड्याची संकल्पना आणि फुले दाम्पत्याचा इतिहास मांडणाऱ्या या देखाव्यातून शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

गणेशोत्सवाच्या सजावटीतून स्त्री शिक्षणाचा जागर

सरपंच निलिमा नंदू म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक विशेष संकल्पना साकारली आहे. गणपती बाप्पाच्या सजावटीतून थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणासाठीच्या कार्याला अभिवादन करण्यात आले आहे.

या देखाव्यात भिडे वाड्याची संकल्पना मांडण्यात आली असून, मुलींच्या शिक्षणासाठी फुले दाम्पत्याने केलेल्या संघर्षाची आठवण करून देण्यात आली आहे. हा देखावा केवळ ऐतिहासिक घटनांची मांडणी नसून, आजच्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा संदेशही देतो.

बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनाही अभिवादन

या प्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानासह समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

शिक्षणामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात. त्यामुळे शिक्षण हे केवळ वैयक्तिक प्रगतीचे साधन नसून समाजाच्या विकासासाठीही महत्त्वाचे आहे, असा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला.

सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची आठवण

आज मुलींनी शाळेत जाणे ही स्वाभाविक बाब वाटत असली, तरी पावणेदोनशे वर्षांपूर्वी महिलांच्या शिक्षणाला मोठा विरोध होता. अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली.

स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी सावित्रीबाईंना मोठ्या सामाजिक विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी शिक्षणाची चळवळ थांबू दिली नाही. एका स्त्रीला शिक्षण मिळाल्याचा परिणाम तिच्या कुटुंबावर आणि पुढील पिढीवरही होतो, हा विचार या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आला आहे.

मोबाईलसोबत ज्ञानालाही द्या महत्त्व

आजच्या काळात शाळा, महाविद्यालये, इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र, या संधींचा योग्य उपयोग करून घेतला जात आहे का, असा प्रश्नही या देखाव्यातून उपस्थित करण्यात आला आहे.

आजच्या मुलांनी आणि तरुणांनी मोबाईल, सोशल मीडिया आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतानाच वाचन, अध्ययन, प्रश्न विचारणे आणि नवीन कौशल्ये आत्मसात करण्यावरही भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संगणक तंत्रज्ञान, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांत निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याचा संदेशही देण्यात आला आहे.

मुलगा-मुलगी भेद न करता शिक्षणाची संधी द्या!

पालकांनी मुलगा आणि मुलगी असा भेद न करता दोघांनाही समान शिक्षणाची संधी द्यावी, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक मुलगा आणि मुलगी आत्मविश्वासाने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली, तरच फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या शिक्षण चळवळीचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

गणेशोत्सवातून शिक्षण आणि सामाजिक विकासाचा संकल्प

गणरायाला बुद्धी आणि विद्येची देवता मानले जाते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, मुलगा-मुलगी भेद न करणे, अंधश्रद्धेपेक्षा ज्ञानाला महत्त्व देणे आणि शिक्षणातून गावासह समाजाचा विकास साधण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता आणि सामाजिक न्यायाचा विचार आणि गणरायाच्या बुद्धी-विद्येचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हाच या देखाव्याचा मुख्य उद्देश आहे.