कल्याण: कल्याण–मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघाताने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. या अत्यंत भीषण अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
आधी नवरा हिरावला आता एकाच वेळी पोटच्या तीन मुलांचा गेला बळी
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दिवा येथील अंजना मोहपे यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेहा (वय 19), मानसी (वय 22) आणि प्रथमेश (वय 15) यांचा या दुर्दैवी अपघातात जागीच मृत्यू झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत हे तिघे गावी जात असताना हा अपघात घडला.
हे ही वाचा>> कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात, ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 जणांचा दुर्दैवी अंत
अंजना मोहपे यांचे आयुष्य आधीपासूनच संघर्षमय आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी पती लक्ष्मण यांना कॅन्सरमुळे गमावले होते. त्यानंतर घरकाम करून आपल्या पाच मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी उचलली होती.
मोठी मुलगी निकिता हिचे लग्न झाले असून अंकिता आणि मानसी या पदवीधर आहेत. नेहा हिने नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती, तर प्रथमेशने एसएससी परीक्षा दिली होती. या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे अंजना यांना अद्याप त्यांच्या तीन मुलांच्या मृत्यूची माहिती देण्यात आलेली नाही.
हे ही वाचा>> पुण्याची गोष्ट : पुणेकरांनो महिनाभर हा पूल राहणार बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करू शकता वापर
या अपघातात मुरबाड येथील शेतकरी गणपती मधे, कल्याणचे दीपक गवळी आणि महसूल विभागातील सहाय्यक भूषण घोरपडे यांचाही मृत्यू झाला आहे. कोणी औषध घेण्यासाठी तर कोणी जॉबवर जात होते, मात्र या अपघाताने सर्वांचे जीवन एका क्षणात संपवले. या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षतेचा आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्न उपस्थित केले आहे.
भीषण अपघातातील मृतांची नावं
1. प्रशांत रुपेश चेंदणे (वय 21 वर्ष)
2. जिजाबाई गोविंद केंबारी (वय 60 वर्ष)
3. भूषण घोरपडे (वय 45 वर्ष)
4. नेहा मोहपे (वय 16 वर्ष)
5. मानसी मोहपे (वय 20 वर्ष)
6. प्रथमेश मोहपे (वय 15 वर्ष)
7. दीपक गवळी (वय 26 वर्ष)
8. अनंता पवार (वय 60 वर्ष)
9. गणपती मधे
10. अज्ञात व्यक्ती (अद्याप ओळख पटलेली नाही)
11. अज्ञात व्यक्ती (अद्याप ओळख पटलेली नाही)
ADVERTISEMENT











