Beed News, रोहिदास हातागळे : एकीकडे बाळ जन्माला आल्याचा आनंद, तर दुसरीकडे शासकीय रुग्णालयाच्या कथित निष्काळजीपणामुळे आई मृत्यूशी झुंज देत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या 19 वर्षीय तरुण महिलेच्या सिझर शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी पोटात सर्जिकल ग्लोव्हज (हातातील हातमोजे) आणि नॅपकिन (कागदी रुमाल) तसाच ठेवल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. 1 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या संध्या यांच्यावर सिझर करून चार दिवसांनंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र, घरी पोहोचताच त्यांना पोटात असह्य वेदना आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
ससून रुग्णालयता शस्त्रक्रिया
रुग्णाची तब्येत ढासळल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले, जिथे तपासणीदरम्यान पोटात काहीतरी 'अनोळखी वस्तू' असल्याचे स्पष्ट झाले. खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने आणि प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्यामुळे त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. ससून रुग्णालयात पार पडलेल्या दुसऱ्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी त्यांच्या पोटातून सर्जिकल हातमोजे आणि कागदी रुमाल बाहेर काढल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्या ससून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
हे ही वाचा : 5 लाखांचा दंड, तुकाराम मुंढेंना दणका! पुण्यातील डेअरीचा किस्सा
उलट्या होत असतानाच डिस्चार्ज
या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. "माझ्या पत्नीची ही दयनीय अवस्था केवळ आणि केवळ बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच झाली आहे. या बेजबाबदार डॉक्टरांवर कडक कारवाई झाली पाहिजे," अशी उद्विग्न मागणी पीडित महिलेच्या पतीने केली आहे. तर पीडितेच्या आईने सांगितले की, सिझरनंतर मुलीला उलट्या होत असतानाच परिचारिकांनी डिस्चार्ज दिला होता. प्रकृती बिघडल्याने शेवटी पुण्यातील ससूनमध्ये भरती करावे लागले, जिथे ऑपरेशननंतर पोटातून हातमोजे आणि कागद काढण्यात आले.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाची संथ स्थिती, तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
महिला डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस
आरोग्य यंत्रणेला शॉक देणाऱ्या या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनात आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाने घटनेची तात्काळ गंभीर दखल घेतली असून, संबंधित महिला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस (शो-कॉज नोटीस) बजावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली असून, तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












