मुंबई: नैऋत्य मान्सूनने यंदा विक्रमी वेगाने वाटचाल करत केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या एका दिवसात, म्हणजेच 26 मे 2025 रोजी, महाराष्ट्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, केरळमध्ये 24 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले, जे गेल्या 35 वर्षांतील सर्वात जलद आगमन आहे. त्यानंतर अवघ्या 24 तासात मान्सूनने महाराष्ट्र गाठला आहे. दरवर्षी मान्सून केरळातून महाराष्ट्रात पोहचण्यासाठी 6 ते 7 दिवसांचा कालावधी घेतो. मात्र, यंदा पहिल्यांदाच पावसाने अत्यंत वेगवान मजल मारली आहे. यंदा मे महिन्यात सरासरीपेक्षा प्रचंड पावसाची नोंद झाली आहे, जी एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे.
ADVERTISEMENT
केरळ ते महाराष्ट्र: मान्सूनचा अत्यंत जलद प्रवास
हवामान खात्याच्या अहवालानुसार, यंदा अरबी समुद्रातील अनुकूल चक्रीय वातावरण आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यामुळे मान्सूनसाठी अत्यंत पोषक वातावरण झालं आणि त्याला प्रचंड गती मिळाली. त्यामुळे केरळमध्ये 1 जून ऐवजी 24 मे रोजीच मान्सून दाखल झाला. पण त्यानंतर जे झालं त्यामुळे अवघा महाराष्ट्र चक्रावून गेला आहे.
हे ही वाचा>> मुंबईसह उपनगरात पावसाचं थैमान; मध्य रेल्वेतील 'या' रेल्वेस्थानकात शिरलं पाणी, मुंबईकरांची दैना
कारण अवघ्या 24 तासात मान्सून हा केरळहून महाराष्ट्रात दाखल झाला. सध्या मान्सून तळकोकणात पोहोचला आहे. जो आता लवकरच उर्वरित महाराष्ट्रात पोहचेल. हवामान तज्ज्ञांच्या मते, 5 जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकण आणि गोव्यात स्थिर होईल, तर 15 जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल.
मुंबईत पावसाचं थैमान, पुढील काही तास महत्त्वाचे
मुंबईसह काही उपनगरांमध्ये पावासाचा जोर कायम पाहताना दिसत आहे. परळ, दादर हिंदमाता तसेच पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर पावसाचे पाणी साचलं आहे. त्याचप्रमाणे काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. यामुळे प्रवाशांना लोकलच्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
यामुळे काही रहिवाशांना या पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत मुंबईतील काही उपनगरांमधील रस्ते खचले आहेत. त्याचप्रमाणे सायन पनवेल महामार्गावरही मोठ्या प्रमाणात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. दरम्यान, पुढील काही तास हे मुंबईकरांसाठी फार महत्त्वाचे असणार आहेत.
शेतीसाठी दिलासादायक बातमी
महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या समस्यांना तोंड देत आहेत. यंदा वेळेआधी आणि जोरदार पावसाचा अंदाज असल्याने खरीप हंगामासाठी ही आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 105% जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’चा प्रभाव तटस्थ राहणार असून, ‘ला निना’च्या सक्रियतेमुळे पावसाचे प्रमाण वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हे ही वाचा>> मान्सून मुंबईत दाखल, नेहमीपेक्षा तब्बल 12 दिवस लवकर, हवामान खात्याने काय म्हटलं?
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
कोकण किनारपट्टीवर, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये, 26 मेपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा
मान्सूनच्या जलद आगमनामुळे उष्णता आणि उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यातच मुंबई, पुणे आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती, ज्यामुळे रस्ते आणि वाहतुकीवर परिणाम झाला होता. यंदा कोकण आणि मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता असून, अन्नधान्य उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम शेती आणि अर्थव्यवस्थेवर होईल.
35 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
35 वर्षांतील सर्वात जलद मान्सून आगमनाने महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हवामान खात्याने पुढील काही आठवड्यांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून, दुष्काळग्रस्त भागांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. नागरिक आणि शेतकऱ्यांना या पावसाळ्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तयारी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
