Jalgaon Crime News : जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत एका 30 ते 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली आहे. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून हा प्रकार घडला असून, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग परिसरात सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 8 वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरुण संशयास्पदरीत्या वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर भगवान सोनवणे यांचा 3 वर्षांचा मुलगा विराट उर्फ लकी याला उचलून घेऊन जात असल्याचा संशय उपस्थितांना आला. या संशयाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि बघता बघता मोठा जमाव गोळा झाला.
हे ही वाचा : प्रियकरासमोर तरुणीवर 7 जणांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार! बळजबरीने पैशांची मागणी अन्...
अमानुष मारहाण आणि पोलिसांची धाव
जमावाने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा पोलिसांना कळवण्याऐवजी सदर तरुणाला पकडून लाथा-बुक्क्यांनी आणि मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत होते आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या.
उपचारादरम्यान मृत्यू आणि 5 जण ताब्यात
गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला आणि शरीराच्या अंतर्गत भागाला मार लागल्याने तो शुद्धीवर येऊ शकला नाही. अखेर मंगळवारी 24 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:30 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : NEET परीक्षा देऊन वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी दबाव, मुलाने वडिलांना संपवलं, मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये भरले
पाच संशयित ताब्यात
याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मनोहर सोनवणे, अजय कोळी, प्रशांत सोनवणे, अजय ऊर्फ बादल सोनवणे आणि अफताब आरिफ खाटीक अशा पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात या पाच जणांसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा 'मॉब लिंचिंग'चा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ADVERTISEMENT











