सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याच्या मागणीसाठी बार्शी शहरात बंद पाळण्यात आला. शिवाय, तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा देखील काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व वंचितचे नेते अॅड. विवेक गजशिव व धनंजय जगदाळे यांनी केले. शहरातील व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवून आंदोलनास सहकार्य दर्शवले.
ADVERTISEMENT
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर फुलवाले चौक, लोखंड गल्ली, पांडे चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जोपासण्याचा निर्धार व्यक्त करत आंदोलन वातावरणात जोश निर्माण झाला.
हेही वाचा : इंस्टाग्रामवरून तरुणीशी मैत्री, लेफ्टनंट अधिकारी ओळख सांगत तिच्या घरी गेला अन्..
मोर्चावेळी कोण कोणत्या मागण्या करण्यात आल्या?
आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार एफ. आर. शेख यांच्यामार्फत शासनाकडे विविध मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायमस्वरूपी बंदी घालावी, छत्रपती संभाजीनगर येथील आंबेडकरी तरुणांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत. सोनई येथील मातंग बांधवाला मारहाण करणाऱ्या गुंडांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारीवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्रावर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्या होत्या.
सायंकाळी 6 नंतर बंद घेतला मागे
मोर्चादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आवाज उठवला. आंदोलनानंतर दैनंदिन व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आले. शिवाय, वंचित बहुजन आघाडीकडून सायंकाळी 6 नंतर बंद मागे घेण्यात आला.
या मोर्चास विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, माकपचे तानाजी ठोंबरे, प्रवीण मस्तूद, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशिद, काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, भीम टायगर संघटनेचे शंकर वाघमारे, डीपीआयचे आशिष शिंदे, आनंद चांदणे, तसेच मराठा सेवा संघाचे आबा काळे यांनी या मोर्चात सहभागी होत आरएसएसविरोधात निषेध नोंदविला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : फलटणच्या महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पोलिसांच्या हाती, मृत्यूचं कारण समोर
ADVERTISEMENT











