Pune News : पुण्यातील भूमिगत मेट्रोच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार पेठ परिसरात एका नागरिकाने थेट मेट्रोच्या बोगद्यावर बोअरवेल मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे मेट्रो प्रशासनात खळबळ उडाली असून सुरक्षेच्या मुद्द्यावर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
ADVERTISEMENT
कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मोठे असे संबंधित व्यक्तीचे नाव असून त्यांच्या घराखालून पुणे मेट्रोचा भूमिगत बोगदा जातो. हा बोगदा शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गावर आहे. असे असतानाही मोठे यांनी त्या ठिकाणी बोअरवेल ड्रिलिंग सुरू केले. ड्रिलिंग मशीनने थेट मेट्रोच्या बोगद्याच्या काँक्रीट छताला छेद दिला आणि आतपर्यंत पोहोचले. या निष्काळजीपणामुळे बोगद्याच्या संरचनेला धोका निर्माण झाला असून कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा : भोंदूबाबा खरातसोबतची 'ती' डील तरीही उपजिल्हाधिकारी भांडे-पाटलांची क्रीम खात्यात बदली!
मोठा अनर्थ टळला
ही घटना खडक पोलीस ठाण्यात समोर असलेल्या घरात घडल्यामुळे पोलीस यंत्रणाही तातडीने सक्रिय झाली. सुदैवाने, ड्रिलिंगच्या वेळी बोगद्यातून मेट्रोची वाहतूक सुरू नव्हती. अन्यथा मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. दरम्यान, पोलिसांनी संबंधित घरमालक तसेच बोअरवेल ड्रिलिंग करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : नालासोपारा : पालकांचा हलगर्जीपणा नडला, बिस्किट भरवताना भटक्या कुत्र्याचा चावा; 9 वर्षीय मुलीचा रेबीजने मृत्यू
पूर्व परवानगी आवश्यक
या घटनेमुळे शहरातील भूमिगत प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, नागरिकांनीही बांधकाम किंवा बोअरवेलसारख्या कामांपूर्वी संबंधित परवानग्या आणि माहिती घेणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT











