नालासोपारा : पालकांचा हलगर्जीपणा नडला, बिस्किट भरवताना भटक्या कुत्र्याचा चावा; 9 वर्षीय मुलीचा रेबीजने मृत्यू

Nalasopara News : नालासोपारा पश्चिम येथील कशिश सहनी या 9 वर्षीय चिमुरडीचा रेबीजमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 'मदर मेरी' शाळेत चौथीत शिकणारी कशिश पाच महिन्यांपूर्वी आपल्या आजोबांसोबत फिरायला गेली असताना, एका भटक्या कुत्र्याला बिस्किट भरवताना कुत्र्याने तिच्या हाताला चावा घेतला होता.

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

दिव्येश सिंह

25 Mar 2026 (अपडेटेड: 25 Mar 2026, 10:23 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : पालकांचा हलगर्जीपणा नडला

point

बिस्किट भरवताना भटक्या कुत्र्याचा चावा

point

9 वर्षीय मुलीचा रेबीजने मृत्यू

Nalasopara News : मुंबईतील नालासोपारा पश्चिम येथील कशिश सहनी या 9 वर्षीय चिमुरडीचा रेबीजमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 'मदर मेरी' शाळेत चौथीत शिकणारी कशिश पाच महिन्यांपूर्वी आपल्या आजोबांसोबत फिरायला गेली असताना, एका भटक्या कुत्र्याला बिस्किट भरवताना कुत्र्याने तिच्या हाताला चावा घेतला होता. घटनेनंतर आजोबा तिला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन गेले, परंतु इंजेक्शनच्या प्रचंड भीतीपोटी कशिशने तिथे मोठा गोंधळ घातला आणि रडू लागली. तिच्या हट्टामुळे आणि भीतीमुळे अखेर तिला इंजेक्शन न देताच घरी परत आणण्यात आले. काही दिवसांत जखम सुकल्याने कुटुंबीयांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले, जे पुढे अत्यंत घातक ठरले.

हे वाचलं का?

चार दिवसांपूर्वी तब्येत खालावली

गेल्या चार दिवसांपूर्वी कशिशची तब्येत अचानक खालावली आणि तिचे डोळे लाल होऊन तिला त्रास होऊ लागला. प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला तातडीने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, पाच महिन्यांपूर्वी शरीरात शिरलेल्या रेबीजच्या विषाणूंनी तिची प्रकृती पूर्णपणे बिघडवली होती. अखेर रविवारी (22 मार्च) रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिकांनी वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हे ही वाचा : भोंदूबाबा खरातसोबतची 'ती' डील तरीही उपजिल्हाधिकारी भांडे-पाटलांची क्रीम खात्यात बदली!

संपर्कातील लोकांची आरोग्य तपासणी

या घटनेची गंभीर दखल घेत वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कशिशच्या संपर्कात आलेल्या तिच्या पालकांची, घरातील सदस्यांची आणि परिसरातील इतर मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेबीज हा अत्यंत धोकादायक आजार असून वेळीच उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने परिसरात सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा : 26 मार्चपासून सुरु होतोय गजकेसरी राजयोग, 'या' राशींच्या लोकांचे सुवर्णदिवस सुरु, जे हवं ते मिळणार!

निष्काळजीपणा जीव घेऊ शकतो

डॉ. भक्ती चौधरी यांनी पालकांसाठी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे की, अनेकदा लहान मुले इंजेक्शनच्या भीतीमुळे जखम लपवून ठेवतात किंवा उपचार घेण्यास नकार देतात. अशा वेळी पालकांनी मुलांशी प्रेमाने संवाद साधून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. कुत्र्याने किंवा मांजराने साधा ओरखडा काढला तरी घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता, तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे अनिवार्य आहे. थोडासा निष्काळजीपणा एखाद्याचा जीव घेऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अशा घटनांकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.