पंढरपूर : उजव्या हाताच्या बोटात वेदना, डॉक्टरांनी केले डाव्या हाताच्या बोटाचे ऑपरेशन; उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

मुंबई तक

• 08:36 AM • 29 Mar 2026

पंढरपूरातील उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उजव्या हाताच्या सहाव्या बोटाच्या ऑपरेशनसाठी एका 6 वर्षाच्या चिमुकल्याला याठिकाणी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याच्या डाव्या हाताच्या बोटाचेच ऑपरेशन केले.

Pandharpur News

Pandharpur News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पंढरपूर : उजव्या हाताच्या बोटात वेदना

point

डॉक्टरांनी केले डाव्या हाताच्या बोटाचे ऑपरेशन

point

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

Pandharpur News : पंढरपूरातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 6 वर्षीय चिमुरड्याच्या उजव्या हाताच्या सहाव्या बोटाचे ऑपरेशन करायचे असताना, डॉक्टरांनी चक्क त्याच्या डाव्या हाताचे सुस्थितीत असलेले बोट कापल्याचा खळबळजनक आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात असून सरकारी रुग्णालयांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हे वाचलं का?

ऑपरेशन थिएटरमध्ये अक्षम्य चूक

शाहू सुनील दंदाडे असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. शाहूला जन्मजात दोन्ही हातांना सहा-सहा बोटे होती. त्याच्या उजव्या हाताच्या अतिरिक्त बोटामुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या, त्यामुळे त्याचे पालक त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला खरा, मात्र प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांकडून अक्षम्य चूक झाली. उजव्या हातातील त्रासदायक बोट काढण्याऐवजी डॉक्टरांनी डाव्या हाताचे निरोगी बोट कापून टाकले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हे ही वाचा : 'त्या' बंद दरवाजाचे गूढ, महाराष्ट्रातील 'या' सरकारी इमारतीचा पश्चिम दरवाजा का असतो बंद?

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

शस्त्रक्रिया आटोपल्यानंतर जेव्हा पालकांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांना हा गंभीर प्रकार लक्षात आला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर, आपली चूक लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी संबंधित डॉक्टरांनी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा गंभीर आरोपही पालकांनी केला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे ही वाचा : Personal Finance: रोज 200 रुपये गुंतवा अन् 20 लाख मिळवा.. नेमका फंडा काय?

प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. एका लहान मुलाच्या भविष्याशी खेळणाऱ्या या हलगर्जीपणामुळे सामान्य जनतेमध्ये भीतीचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या चौकशीतून काय निष्पन्न होते आणि दोषी डॉक्टरांवर प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.