Maharashtra Weather : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पूर्व मान्सूनच्या (प्री-मान्सून) सरींमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (सायक्लोनिक सर्क्युलेशन) राज्यात मान्सूनपूर्व अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानमध्ये जरी वाळूचे मोठे वादळ आले असले, तरी त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, आगामी काही दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
40 ते 50 किमी वेगाने वाहणार वारा
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा विभागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे कोकण आणि गोव्याच्या काही भागांत पाऊस पडत असतानाच, काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानही कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांच्या मते, 6 ते 8 जून दरम्यान कोकण आणि महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : जालना हादरलं! विम्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये कोणाचा दिला बळी?
'असे' आहेत अलर्ट
राज्यात पावसाचा धोका लक्षात घेता हवामान खात्याने ठिकठिकाणी अलर्ट जारी केला आहे. यामध्ये गोंदिया, भंडारा, धुळे, नाशिक (घाट परिसर), छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा यांसह विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती आणि मराठवाड्यातील बीड, नांदेड या बहुतांश जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर भागात मात्र पावसाच्या हलक्या सरी बरसतील.
हे ही वाचा : सांगली : वरिष्ठ लिपिकाची महिला सहकाऱ्याकडे नको ती मागणी, एसटी विभागीय कार्यालयात काय घडलं?
विजांच्या कडकडाटासह पाऊस
येत्या 2 ते 4 जून दरम्यान पावसाची तीव्रता पहिल्या दिवसाच्या तुलनेत हळूहळू कमी होत जाईल. 2 जून रोजी विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूरसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'येलो अलर्ट' कायम असेल. 3 आणि 4 जून रोजी सुद्धा मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. 4 जून रोजी प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि रायगड-रत्नागिरी या भागांत पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून इतर ठिकाणी हवामान अंशतः कोरडे किंवा हलक्या स्वरूपाचे राहील.
ADVERTISEMENT











