"MPSC च्या प्रत्येक पदाचा रेट ठरलेला आहे, थेट पदांसाठी बोली लावून टाका"

मुंबई तक

02 Sep 2026 (अपडेटेड: 02 Sep 2026, 08:36 AM)

MPSC result discrepancies : MPSC निकालातील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पुण्यात एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी फेरतपासणी आणि मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी केली आहे.

mpsc result discrepancies

mpsc result discrepancies

Google CTA

बातम्या हायलाइट

point

MPSC निकालातील गुणांवर विद्यार्थ्यांचे गंभीर आक्षेप

point

पुण्यात विद्यार्थ्यांचा संताप, फेरतपासणीची मागणी

MPSC result discrepancies :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांच्या निकालांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र आले असून, त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालातील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत एकाच विषयाच्या दोन पेपरमध्ये मोठा फरक दिसून येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. उदाहरण म्हणून एका विद्यार्थ्याला भूगोलाच्या पेपर एकमध्ये 250 पैकी 121 गुण मिळाले, तर त्याच विद्यार्थ्याला भूगोलाच्या पेपर दोनमध्ये केवळ दोन गुण मिळाले आहेत. याचप्रमाणे समाजशास्त्राच्या एका विद्यार्थ्याला पेपर एकमध्ये 11, तर पेपर दोनमध्ये 100 गुण मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हेही वाचा : रात्री घराबाहेर पडली अन् अचानक गायब! बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाने खळबळ

विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये इतकी मोठी तफावत कशी निर्माण झाली?

विद्यार्थ्यांनी निबंध आणि इंग्रजीच्या गुणांमधील तफावतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका विद्यार्थ्याला इंग्रजीच्या पेपरमध्ये 300 पैकी 67 गुण मिळाले असून, किमान 75 गुणांची आवश्यकता असल्याने तो पात्र ठरलेला नाही. मात्र, त्याच विद्यार्थ्याला निबंधाच्या पेपरमध्ये 250 पैकी तब्बल 195 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मते, एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या पेपरमधील गुणांमध्ये इतकी मोठी तफावत कशी निर्माण झाली, हा गंभीर प्रश्न आहे. एका विद्यार्थिनीने सांगितले की, तिला कटऑफपेक्षा 55 गुणांची आघाडी असूनही इंग्रजीच्या पेपरमध्ये 75 पैकी 74 गुण मिळाल्याने केवळ एका गुणाने अपात्र ठरवण्यात आले. अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना एका-दोन गुणांच्या फरकामुळे पुढील प्रक्रियेपासून बाहेर पडावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय, "MPSC च्या प्रत्येक पदाचा रेट ठरलेला आहे, थेट पदांसाठी बोली लावून टाका", अशी उद्विग्न प्रतिक्रिया देखील एका विद्यार्थ्याने दिली. 

हेही वाचा : Personal Finance: मुलीच्या भविष्यासाठी SSY की PPF? जाणून घ्या कोणती योजना फायदेशीर

निकालातील गुणांच्या तफावतीचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मोठा परिणाम

विद्यार्थ्यांनी ऑप्शनल विषयांच्या मूल्यांकनावरही आक्षेप घेतला आहे. मानविकी शाखेतील समाजशास्त्र, पीएसआयआर यांसारख्या ऑप्शनल विषयांना तुलनेने कमी गुण मिळाले असून, कृषी, गणित, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग यांसारख्या तांत्रिक विषयांमध्ये अधिक गुण दिले गेल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यूपीएससीमध्ये वेगवेगळ्या ऑप्शनल विषयांमधील गुणांचे अंतर कमी करण्यासाठी नॉर्मलायझेशन केले जाते, मात्र MPSC मध्ये अशी प्रक्रिया झालेली नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. राज्यसेवा परीक्षेतील 139 जागांसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी प्राथमिक परीक्षा दिल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे निकालातील गुणांच्या तफावतीचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांनी निकालाची पूर्ण फेरतपासणी करण्याची मागणी केली असून, त्यानंतरच पुढील मुलाखती घेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आधी वैद्यकीय प्रक्रिया आणि मूल्यांकनातील गोंधळ स्पष्ट करणे आवश्यक आहे. परीक्षेपासून पेपर तपासणी आणि मुलाखतीपर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर विश्वास निर्माण करण्यासाठी संस्थात्मक सुधारणा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. MPSC सारख्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राहण्यासाठी मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी, अशी भूमिका पुण्यात जमलेल्या विद्यार्थ्यांनी मांडली.