नवी दिल्ली: देशाच्या सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार घडला. सुनावणी दरम्यान स्वतःची बाजू मांडण्यासाठी उपस्थित असलेल्या एका याचिकाकर्त्याने न्यायमूर्तींशी आक्रमक भाषेत संवाद साधत थेट त्यांना आदेश देण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर न्यायालयात कागद हवेत भिरकावत कथितपणे शिवीगाळही केली. या प्रकारानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला कोर्टरूमच्या बाहेर नेले.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
ही घटना न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि आलोक अराधे (महाराष्ट्रातील न्यायमूर्ती) यांच्या खंडपीठासमोर घडली. संबंधित व्यक्ती स्वतःच आपल्या प्रकरणात बाजू मांडत होती. ही याचिका इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणारी होती.
सुनावणी सुरू होताच याचिकाकर्त्याने न्यायालयाला उद्देशून म्हटले,
"Mr Judicial Servant, I order you to order the registration of an FIR against the ACP, Lucknow."
(“मिस्टर ज्युडिशियल सर्व्हंट, मी तुम्हाला लखनऊच्या एसीपीविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश देतो.”)
हे ऐकताच न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी आश्चर्य व्यक्त करत विचारले,
"You are ordering me? You are ordering us?"
(“तुम्ही आम्हालाच आदेश देत आहात?”)
त्यावर याचिकाकर्त्याने उत्तर दिले,
"That is all from my side. Everything is on record."
(“माझ्याकडून एवढंच. बाकी सर्व काही नोंदीवर आहे.”)
अचानक कागद भिरकावले, कोर्टात तणाव
या संवादानंतर वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. याचिकाकर्त्याने आपल्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे हवेत भिरकावली आणि कथितपणे भारताचे सरन्यायाधीश यांच्याविरोधातही आक्षेपार्ह शब्द वापरले, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्या वेळी सरन्यायाधीश संबंधित खंडपीठावर उपस्थित नव्हते.
हे ही वाचा>> 'गुन्हे धुण्याचे वॉशिंग मशीन, राज्यात काय सुरु आहे?', पक्षांतरावरुन हायकोर्टाचे संतप्त सवाल
घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीला कोर्टरूममधून बाहेर काढले. त्यानंतर न्यायालयातील वातावरण पुन्हा पूर्ववत झाले.
न्यायमूर्तींचा संयम
या संपूर्ण प्रकारात न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि आलोक अराधे यांनी कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया न देता पूर्ण संयम राखला. त्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर सुनावणीची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
पोलिसांनी घेतले ताब्यात
न्यायालयाच्या बाहेर आणल्यानंतर याचिकाकर्त्याला पोलीस कोठडीत सोपवण्यात आले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. ही घटना सर्वोच्च न्यायालयाच्या आंशिक कामकाजाच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी सकाळी घडली. न्यायालयाचे नियमित कामकाज सोमवारी पुन्हा सुरू होईल.
सध्या, याचिकाकर्त्यावर कोणती पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
कोणत्या प्रकरणाची होती सुनावणी?
ही सुनावणी इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेशी संबंधित होती. संबंधित याचिकाकर्त्याची ओळख, मूळ प्रकरणाचे स्वरूप आणि या घटनेनंतर त्याच्याविरोधात कोणती कारवाई करण्यात आली का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील या अभूतपूर्व घटनेची देशभरात चर्चा सुरू असून, न्यायालयातील शिस्त आणि न्यायसंस्थेच्या सन्मानाबाबतही विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहेत.
ADVERTISEMENT












