Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात रविवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसर हादरला आहे. शेतकरी कुटुंबातील गोविंद शेवाळे या तरुणाने आपल्या पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांची हत्या करून अखेर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात पत्नी कोमल (वय 35), मुलगी हर्षाली (9) आणि दोन वर्षांचा मुलगा शिवम यांचा मृत्यू झाला असून, या घटनेसाठी मृत पतीवरच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ही भीषण घटना उघडकीस येण्यापूर्वीच गोविंद शेवाळे यांनी व्हॉट्सअॅपवरील स्टेट्सवर संशय निर्माण करणारी पोस्ट टाकली होती. पहाटे सुमारे 6.51 वाजता त्यांनी स्वतःसह पत्नी-मुलांचे फोटो ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा मजकुरासह टाकले. ही पोस्ट पाहताच परिचित आणि सहकाऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. गोविंद शेवाळे हे गृहरक्षक दलात कार्यरत होते. स्टेट्स पाहिल्यानंतर काहीजणांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली आणि तेथे धक्कादायक प्रसंग समोर आला.
हेही वाचा : निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
घरात प्रवेश करताच गोविंद शेवाळे हे दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळले. पलंगावर पत्नी कोमल आणि दोन्ही मुलांचे मृतदेह पडलेले पाहून एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात या तिघांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. मात्र या कुटुंबात कोणताही मोठा आर्थिक ताण किंवा कौटुंबिक कलह नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणामुळे गोविंद यांनी इतके टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. रविवारी सकाळपासूनच या घटनेमुळे देवळा तालुक्यात तसेच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. परिचित, नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये या दु:खद प्रसंगाबाबत मोठी खळबळ असून, कोणताही वाद किंवा तक्रार नसताना एका संपूर्ण कुटुंबाचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











