प्रतिनिधी, व्यंकटेश दुडुमवार आणि योगेश पांडे: गडचिरोली: नक्षलवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. काल रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने हे सामूहिक आत्मसमर्पण झाले आहे.
ADVERTISEMENT
10 कोटीचं इनाम असलेला भूपती करणार आत्मसमर्पण
तब्बल 10 कोटींचं इनाम असलेला भूपती हा आज (15 ऑक्टोबर) रोजी मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गडचिरोली येथील पोलीस मुख्यालया आत्मसमर्पण करणार आहे.
हे ही वाचा>> Viral News: पुण्याची वाट लागली... नदीपात्रातील हाणामारीचा 'हा' Video आणेल तुमच्याही अंगावर काटा
भूपतिवर वेगवेगळ्या राज्यात मिळून तब्बल 10 कोटी रुपये एवढं इनाम घोषित करण्यात आलं होतं. मात्र, आता त्याने मुख्य प्रवाहात येण्यासाठी स्वत:हून आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे.
गेले काही दिवस सातत्याने सोनू उर्फ भूपती वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडला पाहिजे, आणि सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात माओवाद्यांनी आले पाहिजे अशी भूमिका मांडली होती.
सेंट्रल कमिटीच्या उर्वरित सदस्यांनी त्याच्या या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवला होता. आणि तसे पत्रक काढत ही सोनू उर्फ भूपतीची वैयक्तिक भूमिका असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सोनू उर्फ भूपतीच्या सशस्त्र माओवाद सोडून शांतता वार्ता केली पाहिजे या प्रस्तावाचा परिणाम माओवाद्यांच्या खालच्या कॅडरवर व्हायला लागला होता.
हे ही वाचा>> अलिबाग हादरलं! तरुणाचा तरुणीवर होता 'तसला' संशय, बॉयफ्रेंडची सटकली अन् गर्लफ्रेंडच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करत...
काही दिवसांपूर्वी गडचिरोली डिव्हिजनने एकत्रितरीत्या पत्रक काढत सोनू उर्फ भूपतीच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर उत्तर बस्तर आणि माड डिव्हिजनमधील काही नक्षल कमांडर स्नेही तशाच पद्धतीचे पत्रक काढले होते.
त्यामुळे सोनू उर्फ भूपती लवकरच शरणागती पत्करेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र तो प्रामुख्याने छत्तीसगड किंवा तेलंगणामध्ये शरणागती पत्करेल अशी स्थिती असताना महाराष्ट्र पोलिसांनी बाजी मारली आणि सोनू उर्फ भूपतीचा शस्त्र खाली ठेवून शरणागती पत्करण्यासंदर्भात मन वळवण्यात यश मिळवलं.
काल रात्री दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात सोनू उर्फ भूपतीसह दहा डीव्हीसीएम आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी कमांडरने आपले शस्त्र खाली ठेवले आणि ते गडचिरोली पोलिसांना शरण आले.
या सामूहिक शरणागतीचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील सशस्त्र माओवादावर होणार असून लवकरच महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद पूर्णपणे हद्दपार झाला असं म्हणण्याची वेळ येणार आहे.
नक्षलवादी चळवळीचा चाणक्य: भूपती
भूपती हा नक्षलवादी संघटनेतील एक अत्यंत प्रभावशाली रणनीतीकार मानला जात होते. तो अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सक्रिय होता. तेलंगणातील पेड्डापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असलेला भूपती 1980 च्या दशकात त्याचा मोठा भाऊ दिवंगत नक्षलवादी नेता किशनजी यांच्यासोबत पीपल्स वॉर ग्रुपमध्ये सामील झाला होता. गडचिरोलीमध्ये नक्षलवादी चळवळ स्थापन करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
2010 मध्ये भूपती केंद्रीय प्रवक्ता बनला आणि 2011 मध्ये किशनजी याच्या मृत्यूनंतर त्याला पश्चिम बंगालला पाठवण्यात आले. एप्रिल 2010 मध्ये छत्तीसगडमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तो सूत्रधार होता, ज्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तब्बव 76 जवान शहीद झाले होते.
एका वर्षात तीन मोठे आत्मसमर्पण, नक्षलवाद्यांचा कणा मोडला
भूपती याचे आत्मसमर्पण या संपूर्ण घडामोडीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. गेल्या वर्षभरात भूपती, त्याची पत्नी आणि वहिनीने केलेल्या आत्मसमर्पणामुळे नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे:
* 1 जानेवारी 2025: भूपतीची पत्नी आणि ज्येष्ठ नेत्या विमला सिडाम उर्फ तारक्का हिने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.
* सप्टेंबर 2025: किशनजीची पत्नी आणि केंद्रीय समिती सदस्या सुजाता हिने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.
* आज: मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपतीने त्याच्या 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले आहे.
ADVERTISEMENT
