पुणे: पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणत पुनीत बालन ग्रुपच्या वतीने यंदाही डीजेमुक्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी-मर्दानी खेळ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी दिली.
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यांवरील ऐतिहासिक लाल महाल चौकात संयुक्त दहीहंडी सोहळा रंगणार आहे. पुनीत बालन ग्रुपने दोन वर्षांपासून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरु केला आहे. तर गतवर्षी डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन करून महाराष्ट्रातील पहिली सार्वजनिक डीजेमुक्त दहीहंडी साजरी केली होती. त्यानंतर डीजेमुक्त दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका ग्रुपने सातत्याने घेतली आहे. या उपक्रमाला यंदा व्यापक प्रतिसाद मिळत असून यावर्षी तब्बल 31 गणेश मंडळे या सयुंक्त दहीहंडीत सहभागी होणार आहेत.
या संयुक्त दहीहंडी कार्यक्रमाची सुरवात दुपारी तीन वाजता प्रभात बँडच्या वादनाने होणार आहे. त्यानंतर मानवंदना होणार असून या कार्यक्रमांनंतर रमणबाग तेजस्विनी , पकवाज टाळ, शिवाद्य, गजर, हलगी वादन, मर्दानी खेळ, आवर्तन , समर्थ, शिवमुद्रा आणि अष्टविनायक या पथकांचे सादरीकरण होणार आहे.
‘उत्सवाचा आनंद डीजेशिवायही घेता येतो’
“दहीहंडी आणि गणेशोत्सव हे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहेत. या उत्सवांचा आनंद मोठ्या आवाजाच्या डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही तितक्याच उत्साहाने घेता येतो. गतवर्षी सुरू केलेल्या डीजेमुक्त दहीहंडीच्या उपक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोनशेहून अधिक गणेश मंडळांनी डीजे न लावण्याचा घेतलेला निर्णय ही सकारात्मक आणि स्वागतार्ह बाब आहे. पुढील काळात पुण्यातील उत्सव अधिक पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत, हा आमचा प्रयत्न आहे.' अशी प्रतिक्रिया पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी दिली.
ADVERTISEMENT












