samruddhi mahamarg wardha car truck accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातील वेरूळ आकाजी परिसरात रविवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास हा हृदयद्रावक अपघात घडला. कार आणि आयशर ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर दोन्ही वाहनांनी क्षणात पेट घेतला. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने वाहनांमधील सहा जणांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर प्रशासनाने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली.
ADVERTISEMENT
एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याचे रहिवासी असलेले टिपले कुटुंब आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात सोडून कारने घरी परतत होते. मुलीच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आनंदात परतीचा प्रवास सुरू असतानाच त्यांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार आणि ट्रक या दोन्ही वाहनांनी क्षणात आग पकडली. काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराने आणि आगीच्या लोटांनी वेढला गेला.
हेही वाचा : नरेंद्र मोदी की राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान कोण? अंकशास्त्रज्ञाच्या अंदाजानं उडाली खळबळ
ट्रकचालक आणि क्लीनरनेही जीव गमवावा
या भीषण धडकेमुळे कारचे दरवाजे लॉक झाल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे टिपले कुटुंबातील चारही सदस्यांचा गाडीमध्येच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. आग ट्रकपर्यंतही पसरल्याने ट्रकचालक आणि क्लीनरलाही जीव गमवावा लागला.या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग सुरक्षा पथक, अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दोन्ही वाहनांतील सर्व जणांचा मृत्यू झाला होता.
महामार्ग सुरक्षा पथक, वर्धा पोलीस, अग्निशामक दल, एमएसआरडीसी आणि तज्ज्ञ यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत. वाहतूक सुरळीत होईपर्यंत नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नागपूर-अमरावती महामार्गाचा वापर करून अमरावती गेट इंटरचेंजमार्गे समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्याचे, तर मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्यांनी अमरावती गेट इंटरचेंजवरून बाहेर पडून नागपूर-अमरावती महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने सुरक्षिततेला प्राधान्य देत वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले आहे.
ADVERTISEMENT












