Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील विटा शहरात एका आंतरजातीय विवाहाचा शेवट अत्यंत भयानक पद्धतीने झाला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अविनाश तुकाराम लोटके याने आपली 20 वर्षीय पत्नी श्रद्धा लोटके हिची निर्घृण हत्या केली आहे. प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याच्या संसारात गेल्या काही काळापासून दुरावा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे अविनाशचे तृतीयपंथीयासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाला पत्नी विरोध करत असल्याने तो चांगलाच संतापला होता.
ADVERTISEMENT
विट्यातील सुतारकी मळा परिसरातील सुनील मारुती गाडे यांच्या भाड्याच्या घरात वास्तव्यास असलेल्या या कुटुंबात मंगळवारी मध्यरात्रीनंतर रक्ताचा सडा पडला. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण विटा शहर आणि तालुका हादरून गेला असून पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.
वादातून हत्येचा थरार आणि आरोपीचे पलायन
अधिकची माहिती अशी की, या घटनेच्या रात्री अविनाश आणि श्रद्धा आपल्या लहान मुलासह विट्याच्या यात्रेत फिरायला गेले होते. तिथून मध्यरात्री घरी परतल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार वादावादी सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, पहाटे 4 च्या सुमारास अविनाशने रागाच्या भरात घरातील लोखंडी रॉड उचलून श्रद्धाच्या चेहऱ्यावर, कपाळावर आणि डोक्यावर वर्मी घाव घातले. या भीषण हल्ल्यात श्रद्धाचा जागीच मृत्यू झाला. या निर्घृण कृत्यानंतर आरोपीने अत्यंत थंड डोक्याने आपल्या लहान मुलाला एका मित्राकडे नेऊन सोडले आणि काहीतरी खोटे कारण सांगून तिथून पलायन केले. ही घटना सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली, जेव्हा श्रद्धाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.
हेही वाचा : अमरावती : 180 मुली, 350 व्हिडीओ असल्याचा दावा, सत्य काय? मोबाईलमधून कोणी डाऊनलोड केले व्हिडीओ?
गुन्ह्याचे कारण आणि कायदेशीर कारवाई
विटा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या हत्येमागील कारण अत्यंत क्लेशदायक असल्याचे समोर आले आहे. मयत श्रद्धा आणि आरोपी अविनाश यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. आरोपीला तृतीयपंथीयांचा नाद होता आणि श्रद्धा या गोष्टीला कडाडून विरोध करत होती. या वादासोबतच अविनाश स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेत होता, ज्याचा शेवट अखेर या हत्येत झाला. याप्रकरणी फिर्यादी दीपाली शशीकांत साठे यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या वर्दीवरून गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(V)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विटा पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. विट्यातील एका गॅस एजन्सीत काम करणारा अविनाश गेल्या 4 दिवसांपासून कामावर देखील गेला नव्हता, त्यावरून ही हत्या पूर्वनियोजित होती का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नवरा कोट्याधीश, पण जीम ट्रेनरच्या नादी लागली बायको; प्रकरण कसं आलं उघडकीस? पुढे काय घडलं?
ADVERTISEMENT











