Amravati video scandal , धनंजय साबळे : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे समोर आलेले व्हिडिओ कांड प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर वळण घेत आहे. सुरुवातीला हे प्रकरण केवळ काही व्हायरल क्लिप्सपुरते मर्यादित असल्याचे मानले जात होते, परंतु जसा तपासाचा वेग वाढला, तशा या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दुसरी मोठी कारवाई करत उजेर खान इकबाल खान याला अटक केली आहे. 180 मुली, 350 व्हिडीओ असल्याचा दावाही या प्रकरणात करण्यात येतोय.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजेर खानने मुख्य आरोपी अयान अहमद याच्या मोबाईलमधून व्हिडिओ डाऊनलोड केले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित केले होते. सध्या उजेर खानला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जात असून, त्याला न्यायालयात हजर केले जात आहे. पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडून या कृत्यात आणखी कोणाचे हात आहेत आणि हे व्हिडिओ नेमके कुठे तयार करण्यात आले, याची महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : मित्राच्या बायकोवर प्रेम केल्याची शिक्षा.., गोड बोलून दारु पाजली आणि जीवंत जाळले
मुख्य आरोपीची कोठडी आणि पीडितांची ओळख
या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला 21 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अयानच्या मोबाईलमधून अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, त्यातील पीडित मुलींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 8 पीडितांची ओळख पटली असून इतरांचा शोध सुरू आहे. या तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जात आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे जेणेकरून पीडिता कोणत्याही दबावाशिवाय आपली बाजू मांडू शकतील. विशेष म्हणजे, काही डेटा डिलीट करण्यात आला होता, जो रिकव्हर करण्यासाठी सायबर टीम प्रयत्न करत आहे, ज्यातून मोठे खुलासे होण्याची अपेक्षा आहे.
राजकीय पडसाद आणि पोलिसांचे आवाहन
परतवाडा येथील या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत. विरोधकांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सत्ताधारी पक्षाने तातडीने कारवाई केल्याचा दावा केला आहे. आरोपीच्या राजकीय संबंधांबाबतही चर्चा रंगत आहे; मात्र संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीला संघटनेतून काढून टाकल्याचे स्पष्ट केले आहे. अचलपूर क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची आणि 'एसआयटी' (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून काही संघटनांनी बंदची हाक दिली आहे, परिणामी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही पीडितेचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत, कारण असे करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
परतवाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अद्याप कोणत्याही पीडितेने अधिकृतपणे तक्रार नोंदवलेली नाही, परंतु पोलीस स्वतः त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडितांना कोणत्याही पोलीस ठाण्यात 'झिरो एफआयआर' (Zero FIR) नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांची ओळख पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाणार आहे. सध्या पोलिसांचे संपूर्ण लक्ष आरोपींच्या पोलीस कोठडीवर केंद्रित आहे, कारण तिथूनच या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचता येईल. हा गुन्हा वैयक्तिक स्तरावर केला गेला की यामागे एखादे मोठे संघटित रॅकेट काम करत होते, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्यामुळे या व्हिडिओ कांडाचा संपूर्ण वास्तव समोर येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











