Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बोलवाड येथे उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला आहे. घटनास्थळी सापडलेल्या एका रेल्वे तिकिटामुळे खुनामागचा कट आणि आरोपींची ओळख पोलिसांच्या हाती लागली. चारित्र्याचा संशय आणि पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून पती आणि सासऱ्यानेच या महिलेचा निर्घृण खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT
मृत महिलेचे नाव नितू ऊर्फ शालिनी आकाश यादव (वय 35) असून ती मूळची उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी होती. या प्रकरणी तिचा दुसरा पती आकाश ऊर्फ विशाल दीनदयाळ यादव (वय 24) आणि सासरा दीनदयाळ रामबाली यादव (वय 55, रा. खुज्झी, ठाणा चंदवक, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
रेल्वेच्या तिकीटावरुन झाला महिलेच्या हत्येचा उलगडा
बोलवाड (ता. मिरज) येथील उसाच्या शेतात 23 डिसेंबर रोजी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास हाती घेतल्यानंतर घटनास्थळी पुणे ते मिरजदरम्यानचे रेल्वे तिकीट आढळून आले. हे तिकीट 16 डिसेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या तिकिटाच्या आधारे पोलिसांनी पुणे आणि मिरज रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये आकाश ऊर्फ विशाल यादव आणि दीनदयाळ यादव हे दोघे प्रवास करताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन सखोल चौकशी केली असता खुनाचा संपूर्ण कट उघड झाला.
हेही वाचा : पोलीस कर्मचाऱ्याचा खून करुन मृतदेह शेजारील पडीक घरात पुरला, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नितू हिचे आकाश यादवशी दुसरे लग्न झाले होते. मात्र, तिने आपले पहिले लग्न लपवून ठेवल्याची बाब आकाशला नंतर समजली. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. याच काळात नितूने पती आणि सासरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे आकाश आणि दीनदयाळ यांच्यात प्रचंड चीड निर्माण झाली होती. यातूनच नितूचा काटा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
पूर्वनियोजित कट, महाराष्ट्रात आणून खून
दीनदयाळ यादव याने यापूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव परिसरात म्हशीच्या गोठ्यात काम केले होते. त्यामुळे परिसराची त्याला सखोल माहिती होती. उत्तर प्रदेशात खून केल्यास तात्काळ संशय येईल, त्यामुळे महाराष्ट्रात आणून खून केल्यास प्रकरण उशिरा उघडकीस येईल, असा आरोपींचा अंदाज होता. त्यानुसार नितूला पुण्याच्या मार्गे मिरज परिसरात आणण्यात आले आणि बोलवाड येथील उसाच्या शेतात तिचा खून करण्यात आला. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या रेल्वे तिकिटामुळे आरोपींचा कट फसला. सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











