सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी तपासाचा वेग वाढला असून, पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. या प्रकरणात डॉक्टर प्रशांत बनकर यांचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअप चॅटिंग तपासात समोर आले असून, बनकर यांनी सर्वाधिक कॉल मृत डॉक्टर महिलेला केल्याचे उघड झाले आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत बनकर आणि मृत डॉक्टर यांच्यात सतत संपर्क सुरू होता. या दोघांमधील व्हॉट्सअप चॅटिंगही झाले होते, मात्र ते चॅट नंतर डिलीट करण्यात आले. पोलिसांनी हे चॅट फॉरेन्सिक प्रयोगशाळेमार्फत पुन्हा प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, मृत डॉक्टरांनी गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजता रूम ताब्यात घेतली होती. त्या एकट्याच आत गेल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास त्यांच्या डॉक्टर बहिणीचा सतत कॉल येत होता, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. हॉटेलमधील वेटरने बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शंका घेतली आणि दरवाजा ठोठावला, तरीही आतून काही प्रतिसाद आला नाही. अखेरीस दरवाजा उघडण्यात आला तेव्हा डॉक्टरांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा : 'अबकी बार मोदी सरकार', घोषणेचे निर्माते पियुष पांडे यांचं निधन, जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस हरपला
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पूर्ण रात्रभर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, संबंधित हॉटेलचा प्रत्येक कोपरा तपासण्यात आला आहे. या प्रकरणात संशयित डॉक्टर प्रशांत बनकर आणि पीएसआय बदने दोघेही सध्या फरार आहेत. दोघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन टीम त्यांच्या शोधासाठी रवाना झाल्या आहेत. तपासात सर्वाधिक कॉल ड्यूरेशन प्रशांत बनकर यांचे असल्याचे समोर आले असून, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर फलटणमधील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. फलटणची बदनामी झाली असल्याचे त्यांनी सांगत, “सीडीआर काढले की सर्व सत्य समोर येईल,” असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांचा दौरा दोन दिवसांनंतर फलटणमध्ये होणार असल्याने या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधत, “पूर्वी फलटणमध्ये सरकारी अधिकारी बदलीसाठी विनंती करायचे, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे,” असे म्हणत प्रशासनावर अप्रत्यक्ष टीका केली. फलटण महिला डॉक्टर आत्महत्येचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, प्रशांत बनकर यांच्या कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअप चॅट्समुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











