मुंबई: मुंबईतील केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिच्या एका यूट्यूब चॅनलवरील वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर प्रणित मोरेच्या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर KEM रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
ADVERTISEMENT
या पार्श्वभूमीवर केईएम प्रशासनाने अंतर्गत चौकशीचे आदेश दिले असून दोन प्राध्यापकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीकडून चौकशी अहवाल उद्या सायंकाळपर्यंत सादर केला जाण्याची अपेक्षा आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रणित मोरे यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणादरम्यान शवविच्छेदन विभागात येणाऱ्या मृतदेहांबाबत आणि पुरुष मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबाबत टिप्पणी केली होती. या वक्तव्याचा एक भाग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
हे ही वाचा>> बीड : तलाठ्याच्या बायकोचे अनैतिक संबंध, लग्नाच्या 12 दिवसानंतर आयुष्याचा शेवट
व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित संवेदनशील विषयांवर अशा प्रकारे सार्वजनिक मंचावर बोलणे योग्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. काही सोशल मीडिया यूजर्संनी या वक्तव्याला असंवेदनशील म्हटले, तर काहींनी ते वैद्यकीय शिक्षणातील अनुभवाच्या संदर्भात पाहण्याची भूमिका घेतली.
KEM प्रशासनाची भूमिका
वाद वाढत असताना केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयातील दोन वरिष्ठ प्राध्यापकांकडे या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान संबंधित व्हिडिओ, वक्तव्याचा संपूर्ण संदर्भ, विद्यार्थिनीची बाजू आणि महाविद्यालयाच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का याची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. ज्यानंतर चौकशी अहवाल हा रुग्णालय आणि महाविद्यालय प्रशासनाला सादर केला जाईल.
हे ही वाचा>> Pranit More Solapur : प्रणित मोरेला मारहाण का झाली? सोलापुरातील घटनेवर अभिनेता वीर पहारिया काय म्हणाला?
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी डॉक्टरांकडून अधिक संवेदनशीलतेची अपेक्षा व्यक्त केली, तर काहींनी व्हिडिओचा केवळ एक भाग व्हायरल झाल्यामुळे संपूर्ण संदर्भ लक्षात घेतला गेला नसल्याचे म्हटले.
अहवालाकडे सर्वांचे लक्ष
या प्रकरणात केईएम प्रशासनाचा चौकशी अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. संबंधित वक्तव्य हे वैद्यकीय शिक्षणाच्या अनुभवाच्या संदर्भात होते की त्यातून व्यावसायिक आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे, याबाबतचा निष्कर्ष या अहवालातून समोर येऊ शकतो.
दरम्यान, सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेमुळे हे प्रकरण केवळ एका व्हायरल व्हिडिओपुरते मर्यादित राहिले नसून वैद्यकीय नैतिकता, व्यावसायिक जबाबदारी आणि सोशल मीडिया वापर यावरील व्यापक चर्चेचा विषय बनले आहे.
ADVERTISEMENT











