नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने शैक्षणिक विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. शाळेच्या प्राचार्या आणि काही शिक्षिकांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या शौर्य पाटील या मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली. शौर्यने लिहून ठेवलेल्या दीड पानांच्या सुसाइड नोटमध्ये त्याने स्पष्टपणे लिहिले आहे की, शाळेतील शिक्षिकांकडून होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
ADVERTISEMENT
या घटनेनंतर राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल यांच्यासह शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे. मंगळवारी सकाळी शौर्य पाटीलने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली उडी मारून आपले आयुष्य संपवले. त्यानंतर ही माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचताच परिसरात शोककळा पसरली. शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शौर्य गेल्या काही महिन्यांपासून शिक्षिकांच्या तुच्छतादर्शक वागणुकीमुळे खूप त्रस्त होता. त्याच्यावर सतत दोषारोप, अपमान आणि मानसिक दडपण टाकले जात होते. त्यामुळे तो खूप निराश झाला होता.”
शौर्यने लिहिलेल्या सुसाइड नोटमधून त्याने कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेतला हे स्पष्टपणे लिहिलं होतं. त्यात त्याने आपल्या कुटुंबाबद्दलच्या भावना आणि शिक्षिकांकडून झालेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला आहे. त्याच्या नोटमधील काही शब्द मन हेलावून टाकणारे आहेत.
शौर्य पाटीलच्या सुसाइड नोटमध्ये काय आहे?
सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, “मेरा नाम शौर्य पाटील है. इस मोबाइल नंबर पर कॉल कर देना प्लीज. आय अॅम वेरी सॉरी आय डीड धीस. पर स्कूलवालोंने इतना बोला की मुझे यह करना पड़ा. यदि किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंट्स ने मेरे लिए बहुत कुछ किया, पर मैं उन्हें कुछ भी नहीं दे पाया. सॉरी भैय्या, सॉरी मम्मी. आपका आखिरी बार दिल तोड़ रहा हूं. स्कूल की टीचर है ही ऐसी, क्या बोलूं…”
या शब्दांमधून शौर्यावर झालेला मानसिक ताण किती गंभीर होता हे दिसून येते. कुटुंबीयांनी शिक्षिकांकडून झालेल्या वागणुकीमुळेच शौर्यने आपले प्राण दिल्याचा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांनी शाळेतील संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक अत्यंत संतप्त झाले आहेत. एका प्रतिभावान विद्यार्थ्याचे आयुष्य अशा प्रकारे संपणे ही अत्यंत वेदनादायक बाब असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसोबत कसे वागावे, त्यांच्यावर मानसिक दडपण येऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून शौर्यच्या मृत्यूस जबाबदार कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी चौकशी वेगाने केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











