Zen Sadavarte complaint against women who shouted at bjp minister :मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी नारी शक्ती वंदन बिल मंजूर होऊ न शकल्याच्या निषेधार्थ भाजप आणि सरकारतर्फे महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेस व इतर पक्षांनी या बिलाला केलेल्या विरोधाच्या निषेधार्थ भाजपने रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. याच आंदोलनादरम्यान ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या एका महिलेने आपला संयम गमावला आणि गाडीतून बाहेर येत तिथे उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांना अपशब्द वापरले. महिलेचा मुलगा वाहतूक कोंडीमुळे अडकला असल्याने ही महिला चांगलीच संतापली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान, या प्रकरणात महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.
ADVERTISEMENT
वरळी पोलीस ठाण्यात तक्रार आणि कायदेशीर कारवाईची मागणी
यासंदर्भात लॉ स्टुडंट झेन सदावर्ते यांनी आज (दि.23) वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. झेन सदावर्ते यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित महिलेने सार्वजनिक ठिकाणी केलेले वर्तन आणि वापरलेली अर्वाच्य भाषा यावर आक्षेप नोंदवला. मंत्र्यांसारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींशी आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांशी अशा प्रकारे वागणे चुकीचे असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी झेन सदावर्ते यांनी लावून धरली आहे. या तक्रारीमुळे आता या महिलेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा सुरू झालीये. काही लोकांनी महिलेच्या बाजूचे समर्थन केले आहे, तर काही लोकं तिने अयोग्य भाषा वापरली असं म्हणत आहेत. लोकशाहीत विरोध करण्याचा अधिकार असला तरी तो सनदशीर मार्गाने आणि सभ्य भाषेत असावा, असे मत झेन सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे. आता वरळी पोलीस या महिलेला चौकशीसाठी बोलावणार का आणि तिच्यावर नेमकी कोणती कलमे लावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप कार्यकर्त्यांकडूनही या घटनेचा तीव्र निषेध केला जात असून पोलिसांकडून निपक्षपाती चौकशीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











