Air hostess Varsha Turkar Murder Case : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठावर 35 वर्षीय एअर होस्टेस वर्षा तुरकर यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. त्या पुण्यात राहत होत्या. दिवाळीनिमित्त अडीच वर्षांच्या मुलीसह माहेरी आल्या असताना ही घटना घडली. वर्षा या 14 नोव्हेंबर रोजी गोंदियातील मित्र रितेश अग्रवाल याच्यासोबत फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी महाराष्ट्राच्या दौनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंडराणी गावाजवळ वैनगंगा नदीच्या काठावर ही घटना घडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे विमानतळावर कार्यरत असलेल्या एअर होस्टेसचा मृतदेह आढळला, पोटावर चाकूचे वार
मित्रासोबत फिरायला गेल्यानंतर झाली हत्या
वर्षा यांच्या शरीरावर, विशेषतः पाठीवर धारदार शस्त्राने चार वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला लुटमारीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वर्षा तुरकर या पुण्यात एअर होस्टेस म्हणून काम करत होत्या. 2024 मध्ये त्यांनी समर सैयद यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्या पतीसोबत पुण्यात राहत होत्या. त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्या मुलीसह माहेरी आल्या होत्या. याच काळात त्यांची अभ्यासादरम्यान ओळख झालेला मित्र रितेश अग्रवाल किन्ही येथे आला होता. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी दोघेही फिरण्यासाठी बोंडराणी येथे गेले होते.
हेही वाचा : पंढरपूर : खोदलेली विहीर मोजणी करताना ढासळली, 3 कामगारांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरु
रितेश अग्रवालने कोणता दावा केलाय?
या घटनेनंतर 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास रितेश अग्रवाल याने वर्षा यांचे मेहुणे अश्विनी ऊर्फ पप्पू पटले यांना फोन केला. आपल्यासोबत लुटमारीची घटना घडली असून काही जणांनी वर्षा यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचे त्याने सांगितले. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून वर्षा गंभीर जखमी असल्याची माहितीही त्याने दिली. फोन आल्यानंतर अश्विनी पटले कुटुंबीयांसह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी वर्षा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खैरलांजी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, संध्याकाळी सातच्या सुमारास डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती खैरलांजी पोलिसांना देण्यात आली. मात्र, घटनास्थळ महाराष्ट्रातील दौनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने संबंधित पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. वर्षा यांची रितेश अग्रवाल याच्याशी शिक्षण घेत असताना ओळख झाली होती. 2024 मध्ये समर सैयद यांच्याशी विवाह केल्यानंतर कुटुंबाने नवेगाव सोडून किन्ही येथे वास्तव्य केले होते.
दरम्यान, घटनेनंतर दौनीवाडा पोलिसांनी वर्षा यांच्यासोबत असलेला रितेश अग्रवाल आणि त्यांचे मेहुणे अश्विनी ऊर्फ पप्पू पटले यांना चौकशीसाठी सोबत नेले. घटनास्थळी नेमके काय घडले, वर्षा यांच्यावर हल्ला कोणी केला आणि हत्येमागील कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात अद्याप कोणाच्याही भूमिकेबाबत पोलिसांनी अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेला नाही. वर्षा यांचे वडील धुरंलाल तुरकर यांनी मुलीच्या हत्येची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. वारासिवनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अनूप कुमार उडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी खैरलांजी रुग्णालयातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आवश्यक कार्यवाही केली. वर्षा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मर्ग दाखल करण्यात आला आहे. संबंधित कागदपत्रे आणि तपासाची डायरी दौनीवाडा पोलिसांकडे पाठवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT












