पुणे विमानतळावर कार्यरत असलेल्या एअर होस्टेसचा मृतदेह आढळला, पोटावर चाकूचे वार
Pune airport air hostess varsha turkar case : पुणे विमानतळावर एअर इंडिगोमध्ये कार्यरत असलेल्या 35 वर्षीय वर्षा तुरकरचा वैनगंगा नदीकाठच्या जंगलात मृतदेह आढळला. पोटावर चाकूचे वार, पुरुष मित्र पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे विमानतळावर कार्यरत असलेल्या एअर होस्टेसचा संशयास्पद मृत्यू
मित्राला पोलिसांनी घेतलं ताब्यात
Pune airport air hostess varsha turkar case : पुणे विमानतळावर एअर इंडिगोमध्ये कार्यरत असलेल्या 35 वर्षीय एअर होस्टेसचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या जंगल परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. वर्षा तुरकर असे मृत महिलेचे नाव असून तिच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तिच्यासोबत असलेल्या पुरुष मित्राला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नितेश अग्रवाल असे त्याचे नाव आहे. वर्षा ही पुणे विमानतळावर एअर इंडिगोमध्ये कार्यरत होती. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि तिची हत्या कोणी केली? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
जंगल परिसरात वर्षाचा मृतदेह आढळला
वर्षा तुरकर ही मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरी-नवगाव येथील रहिवासी होती. काही दिवसांपूर्वी ती दिवाळीच्या सुट्टीसाठी आपल्या गावी आली होती. याच काळात ती गोंदिया येथील आपल्या पुरुष मित्रासोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीतील अर्जुनी-बोंडराणी येथील जंगल परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरात वैनगंगा नदीकाठी सागवानाचे जंगल आहे. याच जंगल परिसरात वर्षाचा मृतदेह आढळल्याने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
हेही वाचा : पंढरपूर : खोदलेली विहीर मोजणी करताना ढासळली, 3 कामगारांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरु
वर्षाच्या पोटावर चाकूने वार करण्यात आल्याची माहिती
वर्षासोबत असलेल्या नितेश अग्रवाल याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे वैनगंगा नदीकाठच्या जंगल परिसरात गेले असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. या तिघांनी लुटमारीचा प्रयत्न केला. यावेळी वर्षाच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिसांसह डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक पथक आणि फिंगरप्रिंट पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, या घटनेत नितेश अग्रवाल याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार घटनेचा तपास केला जात आहे.
मात्र, या प्रकरणात काही बाबींमुळे पोलिसांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. वर्षाच्या गळ्यात सोनसाखळी होती. विशेष म्हणजे तिच्या गळ्यातील ही सोनसाखळी चोरीला गेलेली नाही. त्यामुळे नितेशने सांगितलेल्या लुटमारीच्या प्रयत्नाच्या कथनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर तीन अज्ञात व्यक्तींनी लुटमारीच्या उद्देशाने हल्ला केला असेल, तर वर्षाच्या गळ्यातील सोनसाखळी त्यांनी का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या घटनेमागे खरोखरच लुटमारीचा प्रयत्न होता की अन्य काही कारणातून वर्षाची हत्या करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. वर्षाच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, तिच्यावर चाकूने वार करणारे आरोपी कोण आणि या घटनेत तिच्यासोबत असलेल्या नितेश अग्रवालची भूमिका काय, या सर्व बाबींचा उलगडा दवनीवाडा पोलीस तपासातून होणार आहे.
