आधी वडिलांच्या हत्येचा बदला, नंतर मंदिरात जाऊन प्रायश्चित; 7007 गँगशी काय आहे संबंध?
राजस्थानमध्ये आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी थरारक कट रचला. याप्रकरणाशी 7007 गँगचा संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडिलांच्या हत्येचा बदला
मित्रांसोबत मिळून रचला कट
काय आहे 7007 गँगचा संबंध?
Crime News : जयपूरमधील कुख्यात हिस्ट्रीशीटर विजय बाजिया याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा आणि खळबळजनक खुलासा केला आहे. सहा वर्षे जुन्या वैरातून ही हत्या करण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलगा हनीश गोलिया याने त्याचे तीन साथीदार युवराज चौधरी, दिनेश आणि कमलेश यांच्यासोबत मिळून विजयच्या हत्येचा कट रचला. 2019 मध्ये एका दारूच्या दुकानावर विजय बाजिया याने हनीशचे वडील कैलाश यांची हत्या केली होती. कैलाश आणि विजय हे पूर्वी एकत्र राहायचे आणि त्यांच्या घरांमध्ये केवळ 500 मीटरचे अंतर होते, मात्र एका वादातून त्यांच्यात कट्टर वैर निर्माण झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर हनीशच्या मनात बदल्याची आग धगधगत होती आणि विजय तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जोबनेर परिसरात त्याच्यावर यापूर्वीही 4 ते 5 वेळा हल्ल्याचे प्रयत्न झाले होते.
कशी केली हत्या?
हत्येचा कट प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्य आरोपी हनीश गोलिया आणि त्याचे तीन साथीदार बुधवारी (10 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजल्यापासून एका कॅम्पर गाडीतून विजयच्या हालचालींवर नजर ठेवून त्याचा पाठलाग करत होते. सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजता विजय आपल्या फॉर्च्यूनर गाडीतून कालवाड येथील घराकडे निघाला असता, आरोपींनी योग्य संधी साधून आपल्या कॅम्पर गाडीने त्याच्या फॉर्च्यूनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की विजयची गाडी जागीच बंद पडली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विजय गाडीतून बाहेर पडून पळू लागला असता, हनीशने हातात कुऱ्हाड घेऊन त्याचा पाठलाग केला आणि चारही आरोपींनी मिळून विजयवर कुऱ्हाडीने सपासप वार करत त्याला जागीच संपवले.
हे ही वाचा : 13 शिक्षकांची आत्महत्या, 400 कोटींची थकबाकी; पुण्यातील प्रसिद्ध शिक्षणसंस्थेला उच्च न्यायालयाचा दणका
'असे' सापडले आरोपी
या थरारक हत्याकांडानंतर चारही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते, मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडक नाकाबंदी लावली होती. गुरुवारी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पळताना चुकून पोलीस ठाण्याच्या दिशेनेच येत होते आणि अटकेपूर्वी या चौघांनी आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी एका मंदिरात जाऊन दर्शनही घेतले होते. अटक केलेले चारही आरोपी जोबनेर परिसरातील रहिवासी असून मुख्य सूत्रधार हनीश वगळता इतर तिघांचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड समोर आलेला नाही.
हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; BMC च्या ऑडिटमधून धक्कादायक माहिती समोर
7007 गँगची ओळख
पोलीस तपासात या प्रकरणाशी संबंधित आणखी एक धक्कादायक पैलू उघड झाला असून, अटक केलेल्या आरोपींपैकी तिघांच्या उजव्या हातावर एकसारखेच टॅटू गोंदवलेले आढळून आले आहेत. हे टॅटू कुख्यात '7007 गँग'ची ओळख दर्शवणारे असून, परिसरात आपली दहशत, वर्चस्व आणि ओळख निर्माण करण्यासाठी हे तरुण असे टॅटू काढत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या चारही आरोपींच्या अटकेमुळे जुन्या वैरातून घडलेल्या या निर्घृण हत्याकांडाचा आणि त्यामागील गँग कनेक्शनचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे.
