पंढरपूर : खोदलेली विहीर मोजणी करताना ढासळली, 3 कामगारांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरु

Pandharpur ambegaon well collapse : पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथे विहिरीची मोजणी करताना माती आणि दगडांचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून, एका कामगाराचा शोध सुरू आहे.

ADVERTISEMENT

Pandharpur News
Pandharpur News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पंढरपूर : खोदलेली विहीर मोजणी करताना ढासळली

point

3 कामगारांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरु

Pandharpur ambegaon well collapse : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथे विहिरीचे काम सुरू असताना माती आणि दगडांचा ढिगारा कोसळून चार कामगार दबले गेले. या दुर्घटनेत तीन कामगारांचे मृतदेह सापडले असून, एका कामगाराचा शोध सुरू आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात मागील 15 दिवसांपासून विहीर खोदण्याचे काम सुरू होते. विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी तिची मोजणी करण्यासाठी काही कामगार घटनास्थळी आले होते. यावेळी चार कामगार विहिरीच्या आत उतरले होते. सकाळी साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कामगार विहिरीची मोजणी करत असतानाच अचानक एका बाजूचा माती आणि दगडांचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे विहिरीत असलेले चार कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले. ही विहीर जवळपास 50 फूट खोल असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : आधी वडिलांच्या हत्येचा बदला, नंतर मंदिरात जाऊन प्रायश्चित; 7007 गँगशी काय आहे संबंध?

तीन कामगारांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरु 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. विहिरीत कोसळलेले दगड आणि मातीचा ढिगारा मोठ्या प्रमाणात असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. ढिगाऱ्यात मोठमोठे दगड असल्यामुळे ते बाहेर काढण्यासाठी यंत्रांचा वापर केला जात आहे. मात्र, दगडांचा आकार मोठा असल्याने ते हटवण्यास वेळ लागत आहे. या दुर्घटनेत तीन कामगारांचे मृतदेह सापडले असून, आणखी एका कामगाराचा शोध सुरू आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पुण्याहून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी येणार असल्याची माहिती स्थानिक पातळीवर देण्यात आली होती. दरम्यान, उर्वरित कामगाराचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : हॉस्पिटलमध्ये घुसून मेहुण्यावर सपासप वार, ICU बाहेरच हत्या, धक्कादायक कारण समोर

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली

या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, पाण्याच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्याने आपल्या शेतात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला होता. विहिरीचे काम जवळपास पूर्ण झाले होते. मात्र, मोजमाप घेण्यासाठी कामगार खाली उतरले असताना विहिरीचा एका बाजूचा भाग अचानक कोसळला. त्यामुळे चारही कामगार माती आणि दगडांखाली दबले गेले. पाण्याच्या प्रश्नावर पर्याय म्हणून विहीर खोदण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याने स्थानिक नागरिकांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाच्या नियोजनावरही स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नदीला पाणी उपलब्ध असतानाही वीज आणि पाणीपुरवठा बंद केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यासारखे पर्याय शोधावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत असता तर शेतकऱ्यांना दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली नसती, अशी भूमिका स्थानिकांनी मांडली. या दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांना धीर द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. सध्या एका कामगाराचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.