Bengaluru triple murder case : बंगळुरूमधील केआर पुरम परिसरातील साई ग्रीन होम अपार्टमेंटमध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रकरणात 24 वर्षीय श्वेता हिने तिचा लिव्ह-इन पार्टनर 25 वर्षीय केनेथच्या मदतीने स्वतःचे आई-वडील आणि लहान बहिणीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : लेक 40 दिवसांनी आला, मिठी मारत रडले, धमक्या, भीती सांगितली, अभिजीतलाही रडू आलं
हत्येची योजना अन् पुरावे नष्ट करण्यासाठी AI चा वापर
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांनी केवळ हत्येची योजना आखण्यासाठीच नव्हे, तर पुरावे नष्ट करण्याच्या पद्धती जाणून घेण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा वापर केला होता. त्यामुळे तपास यंत्रणांसमोर गुन्हेगारीत AI च्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 22 जून रोजी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हत्या करून बाहेर पडताना श्वेता आणि केनेथ शांतपणे चालत असल्याचे दिसून आले. त्या वेळी त्यांनी नुकतीच तिहेरी हत्या केल्याचा कोणालाही संशय येण्यासारखी कोणतीही हालचाल त्यांच्या वर्तनात दिसत नव्हती.
हेही वाचा : तुफान व्हायरल इरफान जेव्हा राजदीप सरदेसाईंना भेटला... जबरदस्त मुलाखत
50 लाख रुपये उसने घेतले, परत मागतील म्हणून हत्येचा कट
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, श्वेता यापूर्वी एका आयटी कंपनीत काम करत होती, तर केनेथही तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित होता. श्वेताची नोकरी गेल्यानंतर तिने तिच्या आई मुथुलक्ष्मी यांच्याकडून 50 लाख रुपये उसने घेतले होते. हे पैसे तिने केनेथवर खर्च केल्याचे सांगितले जाते. नंतर आई पैसे परत मागेल, अशी भीती वाटू लागल्याने श्वेता आणि केनेथ यांनी तब्बल सहा महिने आधी संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्याचा कट रचल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. या काळात त्यांनी AI टूलला विविध प्रश्न विचारून तिहेरी हत्या कशी करावी, रक्ताचे डाग कसे नष्ट करावेत, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, घरात हल्ला झाल्यास त्याला कसे सामोरे जावे, तसेच क्लाउड किचनसाठी तयार केलेल्या भट्टीत मृतदेह जाळून पुरावे नष्ट करता येतील का, अशा अनेक बाबींची माहिती मिळवल्याचे तपासात समोर आले. AI कडून मिळालेल्या उत्तरांच्या आधारे केनेथने स्वतःच्या फ्लॅटमध्ये क्लाउड किचनसाठी लोखंडी भट्टीही तयार केल्याचे सांगितले जात आहे.
22 जून रोजी श्वेताने प्रथम तिच्या आईला फ्लॅटवर बोलावले. फ्लॅटमध्ये प्रवेश करताच श्वेता आणि केनेथ यांनी तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर वडील सोमा सुंदर आणि लहान बहिण सुप्रिया यांनाही त्याच फ्लॅटमध्ये बोलावून त्यांच्यावरही चाकूने वार करण्यात आले. तिघेही मृत झाल्याचे समजून आरोपी फ्लॅट बंद करून श्वेताच्या आईच्या घरी गेले. तेथून रोख रक्कम आणि दागिने घेऊन ते पुद्दुचेरीकडे रवाना झाले. मात्र, गंभीर जखमी अवस्थेत असलेले सोमा सुंदर जिवंत होते. ते कसेबसे घराबाहेर येत शेजाऱ्यांच्या नजरेस पडले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर सोमा सुंदर यांनी पत्नी मुथुलक्ष्मी आणि मुलगी सुप्रिया फ्लॅटमध्ये असल्याचे तसेच त्यांच्यावर स्वतःची मुलगी श्वेता आणि तिचा मित्र केनेथ यांनी हल्ला केल्याचे सांगितले. तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, मात्र मुथुलक्ष्मी आणि सुप्रिया यांचा आधीच मृत्यू झाला होता, तर उपचारादरम्यान सोमा सुंदर यांचाही मृत्यू झाला.
सोमा सुंदर यांच्या मृत्यूपूर्वीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी श्वेता आणि केनेथचा शोध सुरू केला. दोघेही मोटारसायकलवरून बंगळुरूच्या बाहेरील भागात फिरत राहिले आणि नंतर वेगवेगळ्या बसने पुद्दुचेरीला पोहोचले. तेथून पोलिसांनी प्रथम श्वेताला आणि नंतर एका बारमधून केनेथला अटक केली. चौकशीदरम्यान श्वेताने आईने आयुष्यभर स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि स्वातंत्र्य दिले नाही, त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे लॅपटॉप तपासले असता AI कडून विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे सापडल्याचा दावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर तपासादरम्यान AI टूललाही सहआरोपी करण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, सध्याच्या भारतीय कायद्यानुसार AI ला स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्त्व किंवा गुन्हेगारी हेतू मान्यता नसल्याने त्याच्यावर हत्या प्रकरणात खटला चालवता येत नाही. अशा प्रकरणांमध्ये जबाबदारी ही गुन्ह्याची योजना आखणाऱ्या आणि AI चा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवरच निश्चित केली जाते, तर AI ची भूमिका केवळ डिजिटल पुरावा आणि तपासाचा एक भाग म्हणून पाहिली जाते.
ADVERTISEMENT












