Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अठरा वर्षीय तरुणीचा मृतदेह मक्याच्या शेतात अत्यंत विद्रूप अवस्थेत आढळला. चार नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली आणि ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा व शरीर ॲसिडने जाळल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, हजारो ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरुन राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : घरच्यांचा विरोध असताना लव्ह मॅरेज, मुलगी झाल्यानंतर दोन वर्षांनी सासरी गेला, पण सासऱ्याने अन् मेहुणीने जागेवर संपवलं
शौचाला जाण्यासाठी बाहेर पडली अन्..
11 मार्चच्या रात्री ही तरुणी शौचाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही. पीडिता दररोज अभ्यासासाठी एके ठिकाणी जात असे, जिथे तिचा संपर्क आरोपींशी आला होता. संशयित आरोपी सचिन कुमार यानेच तिला पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. शोध घेत असताना अखेर एका हॉटेलच्या मागील मक्याच्या शेतात तिचा जळालेला मृतदेह सापडला. आपल्या पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून पालकांनी हंबरडा फोडला असून, नराधमांनी साक्ष पुसण्यासाठीच केमिकलचा वापर केल्याचा दावा केला आहे.
'तुम्हीच मुलीला मारले असेल..'
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वेळेत तक्रार देऊनही पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. हताश झालेले नातेवाईक जेव्हा पोलीस ठाण्यात दाद मागण्यासाठी गेले, तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने त्यांनाच धमकावत 'तुम्हीच तुमच्या मुलीला मारून फेकले असेल,' असे विधान केल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जर पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती, तर आज मुलीचे प्राण वाचले असते, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.
हे ही वाचा : चॉकलेट दिले अन् दुकानातच..., दुकानदाराने सहा वर्षांच्या चिमुकलीसोबत काय केले?
महामार्ग रोखला, टायर जाळून निषेध
तरुणीचा मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निदर्शने केली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आरोपी सचिन कुमारसह त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करावी आणि बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.
ADVERTISEMENT











