Crime News: उत्तर प्रदेशातील बागपत येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एक नफीस नावाचा तरुण त्याच्या चुलत भावाच्या पत्नीच्या म्हणजेच वहिनीच्या प्रेमात पडला. नंतर, वहिनीचं सुद्धा आपल्या दिरावर प्रेम जडलं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. नफीस आणि त्याच्या वहिनीने कुटुंबियांचा आणि नातेसंबंधाचा कसलाच विचार न करता एकमेकांसोबत लग्न केलं. मात्र, दोघांच्या या निर्णयामुळे त्यांच्यासोबत भयानक घटना घडली.
ADVERTISEMENT
कुटुंबियांची नफीसला धमकी...
नफीसने त्याच्या वहिनीसोबत लग्न केल्यानंतर, त्याच्या कुटुंबियांनी आणि भावांनी नफीसला स्पष्टपणे सांगितलं की, "आता या गावात कधीही दिसू नकोस." ज्या भावाच्या पत्नीसोबत नफीसने लग्न केलं, तो नफीसचा चुलत भाऊ सुद्धा त्याचा शत्रू बनला. लग्नानंतर, बागपतमध्ये न थांबता नफीस त्याच्या पत्नीला घेऊन सहारनपुर येथे गेला आणि तिथे तो त्याच्या पत्नीसोबत राहू लागला. काही काळानंतर, नफीसच्या आईचा बागपतमध्ये मृत्यू झाल्याची माहिती नफीसला मिळाली. त्यानंतर, तो ताबडतोब बागपतमधील त्याची गावात गेला. पण, त्यावेळी त्याच्यासोबत भयानक प्रकार घडला.
हे ही वाचा: पुण्यात खळबळ! इंदापुरात आढळला पुरुषाच्या पायाचा गुडघ्यापासून तोडलेला भाग... पोलीसही चक्रावले
दांडक्याने बेदम मारहाण अन् हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, आईचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नफीस पुन्हा सहारनपुरला जायला निघाला. त्यावेळी, काही लोकांनी त्याला घेरलं आणि शौकीन, रहिशु, मुस्तकीम, मोहसीन आणि शमीम नावाच्या त्याच्या कुटुंबियांनी त्याला बेदम मारहाण केली. नफीसला दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: लिपिकाद्वारे 15 लाखांची लाच स्वीकारण्यास न्यायाधीशांची संमती, एसीबीने रंगेहात पकडलं; मुंबईच्या माझगाव कोर्टातील प्रकार
पोलिसांचा तपास
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, नफीसच्या चुलत भावांनीच त्याची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणाच्या भावांना त्याला "बागपतमध्ये पुन्हा कधीच दिसू नकोस.." अशी धमकी सुद्धा दिली होती. नफीसच्या मृत्यूनंतर, कुटुंबियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणासंदर्भात, बागपत पोलिसांनी शौकीन, रहिशु, मुस्तकीम, मोहसीन आणि शमीम या तरुणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांनी नफीसचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याचं पोस्टमॉर्टम देखील करण्यात आलं. आतापर्यंत, पोलिसांनी मुख्य आरोपी शौकीन याच्यासब आणखी 2 तरुणांना ताब्यात घेतलं असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT











