दीर आणि वहिनीचं अफेअर! दोन वर्षांच्या चिमुकल्या पुतणीलाच बसवलं जळत्या चुलीवर अन्...

मुंबई तक

• 09:00 AM • 23 Sep 2026

छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये कौटुंबिक वादातून चुलत्याने दोन वर्षांच्या भाचीला जळत्या चुलीवर बसवल्याचा आरोप आहे. गंभीर भाजलेल्या परमेश्वरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

brother in law sister in law affair dispute bilaspur childdeath

प्रातिनिधिक फोटो

Google CTA

बिलासपूर, छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे कौटुंबिक वादातून दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत्यानेच आपल्या दोन वर्षांच्या भाचीला जळत्या लाकडी चुलीवर बसवल्याचा आरोप आहे. गंभीर भाजलेल्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चुलता नितीन कुमार लोनिया याला अटक केली आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

ही घटना बिलासपूर जिल्ह्यातील कोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुटकू गावात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नितीन कुमार लोनिया याचे त्याची भावजय अंकिता हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. अंकिता ही पती सुधीर आणि दोन वर्षांची मुलगी परमेश्वरी यांच्यासोबत राहत होती. २६ ऑगस्ट रोजी अंकिता आपल्या मुलीला घेऊन नितीनसोबत घरातून निघून गेली होती. बराच शोध घेऊनही तिघांचा ठावठिकाणा न लागल्याने मुलीच्या आजोबांनी कोनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर नितीन, अंकिता आणि चिमुरडीबाबत माहिती समोर आली.

हे ही वाचा>> वाशिम: ‘...भाजी बनवता येत नाही', मद्यधुंद अवस्थेत भावावर लोखंडी रॉडने प्रहार

घरी परतल्यानंतर पुन्हा वाद

7 सप्टेंबर रोजी नितीन, अंकिता आणि परमेश्वरी घुटकू गावात परतले. त्यानंतर कुटुंबातील वाद पुन्हा सुरू झाल्याची माहिती आहे. मंगळवारी नितीनचा त्याचा मोठा भाऊ सुधीर याच्यासोबत वाद झाला. काही वेळानंतर नितीन आणि त्याची भावजय अंकिता यांच्यातही वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे.

चिमुरडीला जळत्या चुलीवर बसवल्याचा आरोप

कोनी पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून सुरू असलेला वाद शांत केला. याचदरम्यान नितीनने आपल्या दोन वर्षांच्या भाचीला जळत्या लाकडी चुलीवर बसवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेत परमेश्वरी गंभीररीत्या भाजली.

हे ही वाचा>> डोंबिवली: मित्र-मेत्रिणींसोबत गणपतीच्या दर्शनाला गेली पत्नी, नवऱ्याने केला चाकूने हल्ला

उपचारादरम्यान परमेश्वरीचा मृत्यू

चिमुरडी गंभीररीत्या भाजल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. अखेर उशिरा रात्री उपचारादरम्यान परमेश्वरीचा मृत्यू झाला.

आरोपी चुलत्याला अटक; पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी नितीन कुमार लोनिया याला अटक केली आहे. कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी, चिमुरडीला चुलीवर बसवण्यामागील परिस्थिती आणि संपूर्ण घटनाक्रमाचा पोलीस तपास करत आहेत.