Buldhana Crime News, जका खान : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री कव्वालीचा कार्यक्रम झाल्यानंतर हा वाद सुरू झाला. सोमवारी रात्री दीडच्या सुमारास दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद वाढला. यावेळी दोन्ही गट शस्त्रांसह एकमेकांसमोर आले. या हल्ल्यात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक शेख अनवर अली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आरिफ पठाण गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दोघांना जालना येथे नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : उच्चभ्रू वस्तीतील वृद्ध दांपत्याची हत्या, प्लंबरने स्क्रू ड्रायव्हर भोसकला; मोलकरणीसोबत काय केलं?
दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला अन् हाणामारी
देऊळगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार ब्रह्मा गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 9 वाजता देऊळगाव राजा येथे कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान काही मुलांमध्ये तू-तू, मैं-मैं झाली होती. कव्वालीचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. मात्र त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक शेख अनवर अली हे अमृत नगर परिसरात गेले आणि वाद कशामुळे झाला? याबाबत विचारणा करू लागले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि काही अन्य लोक तेथे आले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला.
हेही वाचा : सांगली : आईने सव्वा वर्षाच्या चिमुकलीला कात्रीने वार करुन संपवलं, जराही दया-माया दाखवली नाही
धारदार शस्त्रांनी केले वार
वाद वाढल्यानंतर दोन्ही गट देऊळगाव राजा पोलिस ठाण्याजवळ पोहोचले. पोलिस ठाण्याच्या गेटसमोरच दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्यानंतर एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेख अनवर अली यांच्या मान आणि गळ्यावर वार करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आरिफ पठाण यांच्या पोटात धारदार शस्त्र घुसवण्यात आले. दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेत आणखी सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
गंभीर जखमी झालेल्या शेख अनवर अली आणि आरिफ पठाण यांना उपचारासाठी जालना येथे नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 20 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार ब्रह्मा गिरी यांनी दिली आहे. पोलिस ठाण्याच्या गेटसमोरच दोन्ही गटांमध्ये झालेल्या या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा आहे.
ADVERTISEMENT












