buldhana crime news, जका खान : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी (एक्स्टेंशन ऑफिसर) म्हणून कार्यरत असलेल्या संदीप मोरे यांना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. विशेष म्हणजे ही कारवाई थेट जळगाव जामोद पंचायत समितीच्या कार्यालयातच करण्यात आली. या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'तू अजून जिवंत आहेस...' सोन्यासारख्या बायकोला हॉस्पिटलच्या बेडवरच संपवलं
बिलाच्या रकमेच्या 3 टक्के इतक्या लाचेची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराचे साडेआठ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी बिलाच्या रकमेच्या 3 टक्के इतक्या लाचेची मागणी केली होती. या मागणीमुळे संबंधित व्यक्तीने थेट अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने या प्रकरणाची पडताळणी केली आणि तक्रारीतील बाबींची खातरजमा केली.
हेही वाचा : प्रियकराच्या भावाने अमृताला संपवलं, चारी-बाजूंनी घात झाला, निष्पाप विद्यार्थीनीचा जीव गेला
सरकारी कार्यालयातच लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला पकडलं
त्यानंतर एसीबीच्या पथकाने जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला. या सापळ्यादरम्यान संदीप मोरे हे 25 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. पंचायत समितीच्या कार्यालयातच झालेल्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली. सरकारी कार्यालयातच लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला पकडण्यात आल्याने या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक ती पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT












