'त्या' केससाठी जावई बनला हैवान, सासरकडील लोकांवर थेट चाकूने हल्ला!

मुंबई तक

• 07:00 AM • 03 Sep 2026

A shocking incident took place in Ballarpur, Chandrapur, after a dispute broke out between a son-in-law and his in-laws over withdrawing a divorce case. The dispute escalated when the son-in-law allegedly attacked three people, including his two brothers-in-law, with a knife.

chandrapur ballarpur son in law knife attack wife divorce dispute two brothers injured

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: चॅटजीपीटी

Google CTA

चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये कौटुंबिक वादातून चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटस्फोटाचा सुरू असलेला खटला मागे घेऊन पत्नीला आपल्या सोबत पाठवण्याची मागणी घेऊन सासरी गेलेल्या जावयाचा वाद विकोपाला गेला. यानंतर आरोपीने पत्नीच्या दोन भावांवर आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्यांच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून, दोन्ही भावांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी जावयाला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचलं का?

2021 मध्ये लग्न, त्यानंतर वादाला सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झा यांचा वर्ष 2021 मध्ये चंद्रपूर येथील शहानवाज हुसेन शेख जमीर याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर सानिया आपल्या मुलासह बल्लारपूर येथे वडिलांच्या घरी राहू लागल्या. पतीविरोधात चंद्रपूरमध्ये प्रकरण दाखल असल्याचे सांगण्यात येत असून, दोघांमधील घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असल्याची माहिती आहे.

‘घटस्फोटाची केस मागे घ्या, पत्नीला माझ्यासोबत पाठवा’

मंगळवारी, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहानवाज हा आणखी एका तरुणासोबत अॅक्टिव्हावरून बल्लारपूरमधील बुद्धनगर वॉर्डातील विश्वशांती चौक, टीचर कॉलनी परिसरात असलेल्या सासरच्या घरी पोहोचला. त्याच्यासोबत आलेला तरुण बाहेरच थांबला, तर शहानवाज घरात गेला.

हे ही वाचा>> अडीच वर्षांपासून बहिणीसोबत प्रेमसंबंध, भावाने दारूत विष मिसळून प्रियकराला संपवलं

पोलिसांच्या माहितीनुसार, शहानवाजने सासरच्यांकडे घटस्फोटाचा सुरू असलेला खटला मागे घेण्याची आणि पत्नीला आपल्या सोबत पाठवण्याची मागणी केली. यावर सासऱ्यांनी न्यायालयात प्रकरण सुरू असल्याचे सांगत, सानियाला स्वतःचा निर्णय घेऊ द्यावा, अशी भूमिका घेतली. याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला.

पत्नीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न?

वाद वाढल्यानंतर शहानवाजने पत्नीचा हात पकडून तिला जबरदस्तीने सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याला तिच्या भावांनी विरोध केला. त्यांनी शहानवाजला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाद आणखी चिघळला.

आरोपानुसार, शहानवाजने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि खिशातून चाकू काढला. त्यानंतर त्याने पत्नीचा भाऊ अयान बेग याच्यावर चाकूने हल्ला केला.

दोन भावांवर चाकूने हल्ला

या हल्ल्यात 23 वर्षीय अयान बेग याच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आरोपीने दुसरा साला 21 वर्षीय मुस्सवीर बेग याच्यावरही चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा>> पत्नीचा दीरावर जीव, प्रियकराला हाताशी धरत नवऱ्याचा काढला काटा

दरम्यान, हा हल्ला थांबवण्यासाठी आणि दोन्ही भावांना वाचवण्यासाठी ताजखान पठाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हातालाही चाकू लागून ते जखमी झाले.

अशाप्रकारे काही क्षणांतच सासरच्या घरातील कौटुंबिक वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. हल्ल्यानंतर आरोपी शहानवाज अॅक्टिव्हावरून घटनास्थळावरून पसार झाला.

जखमींना रुग्णालयात दाखल

हल्ल्यानंतर तिघेही रक्तबंबाळ अवस्थेत होते. त्यांना तातडीने बल्लारपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर अयान बेग आणि मुस्सवीर बेग यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर करण्यात आले.

पोलिसांची तातडीने कारवाई

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. प्रभारी अधिकारी बिपिन इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे यांच्यासह पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.

घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी शहानवाज हुसेन शेख जमीरचा पोलिसांनी शोध सुरू केला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.

घटस्फोटाच्या वादातून हिंसक संघर्ष

या संपूर्ण घटनेतून वैवाहिक वाद, घटस्फोटाचा सुरू असलेला खटला आणि पत्नीला सोबत नेण्याच्या मागणीवरून झालेला संघर्ष समोर आला आहे. मात्र, पत्नीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर चाकूने हल्ला केल्याचे आरोप असून, या प्रकरणातील नेमकी पार्श्वभूमी आणि हल्ल्याचे कारण पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.