Crime News : छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये एक वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या दोन नातवंडांचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत दांपत्याच्याच एका मुलाला आणि नातवाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात मालमत्ता आपल्या नावावर व्हावी यासाठी हा कट रचल्याचे उघड झाले आहे.
ADVERTISEMENT
कुऱ्हाडीने वार करुन संपवले
ही भयानक घटना शिवरीनारायण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भनवतरा गावात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांचे मृतदेह त्यांच्या बांधकाम सुरु असलेल्या घरामध्ये सापडले. गुरुवारी (14 मे) सकाळी मजूर कामासाठी तिथे पोहोचले असता घरामध्ये चौघांचे मृतदेह पडलेले पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यानंतर घटनास्थळी तपास सुरू करण्यात आला.
मेदनी प्रसाद कश्यप (70 वर्षे), त्यांची पत्नी कांती बाई (65 वर्षे), पीतांबर कश्यप (17 वर्षे) आणि मोगरा (25 वर्षे) अशी मृतांची ओळख पटली आहे. पीतांबर आणि मोगरा हे दोघे त्यांचे नातू आणि नात होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील सर्व सदस्य बांधकाम सुरु असलेल्या घरात झोपलेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
हे ही वाचा : जालना : चेहरा, छाती, गळा, हात काहीच सोडलं नाही, प्रेमात पडल्याने 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
वडील आणि मुलाला अटक
तपासादरम्यान पोलिसांनी मेदनी प्रसाद यांचा मुलगा सोनसाई आणि त्याचा मुलगा दकेश्वर उर्फ गोलू याला ताब्यात घेतले. असा आरोप आहे की, त्या दोघांनी झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करून चौघांची हत्या केली. कुटुंबाच्या संपूर्ण मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी अनेक महत्त्वाचे पुरावेही गोळा करण्यात आले आहेत.
पोलीस तपासात असेही समोर आले आहे की, मेदनी प्रसाद यांना तीन मुले होती, ज्यापैकी एक सोनसाई आहे. सोनसाई यापूर्वीही आपल्या एका भावाच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्या प्रकरणात त्याने सुमारे 15 वर्षांची शिक्षा भोगली होती. तर कुटुंबातील तिसऱ्या मुलाचा कथितरित्या आत्महत्येमुळे मृत्यू झाला आहे. या कौटुंबिक इतिहासामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
हे ही वाचा : आळंदी : महिलेच्या घरात घुसून सामुहिक अत्याचार, श्याम महाराजावर गंभीर आरोप
सामूहिक हत्याकांडाने खळबळ
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पीतांबर हा त्याच्या मृत भावाचा एकुलता एक मुलगा होता, तर मोगरा ही दुसऱ्या मृत भावाची एकुलती एक मुलगी होती. मालमत्तेचे इतर वारसदार संपवण्याच्या उद्देशानेच या दोन्ही मुलांची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांना आहे. या पैलूतून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सध्या पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींची चौकशी सुरू आहे.
घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. या सामूहिक हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबात दीर्घकाळापासून मालमत्तेवरून वाद सुरू होता, ज्याचे रूपांतर अखेर चार जणांचा बळी घेणाऱ्या रक्तरंजित घटनेत झाले.
ADVERTISEMENT











