'हा माझा मुलगा नाही...' चिमुकल्याला खांबावर आपटून मारले, नराधम बापाचं कृत्य

मुंबई तक

• 08:33 AM • 17 Aug 2026

हैदराबादमध्ये एका वडिलांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाचे डोके पूलाच्या खांबावर आपटले आणि नंतर त्याला रस्त्यावर फेकून दिले. चार दिवसांनंतर गंभीर अवस्थेत त्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'हा माझा मुलगा नाही...'

point

चिमुकल्याला खांबावर आपटून मारले

point

नराधम बापाचं कृत्य

Crime News : हैदराबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बापानेच आपल्या चार वर्षांच्या निष्पाप मुलाची अमानुषपणे हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्टच्या सकाळी पीव्हीएनआर एक्सप्रेसवेखालील पिलर नंबर 104 जवळ आरोपीने हे भयानक कृत्य केले. आरोपी पित्याने आधी मुलाला चालत्या लॉरीखाली ढकलण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याचे डोके पिलरवर आपटले. गंभीर जखमी झालेला हा चिमुकला सलग चार दिवस मृत्यूशी झुंज देत होता, मात्र अखेर 9 ऑगस्ट रोजी त्याची प्राणज्योत मालवली.

हे वाचलं का?

'हा माझा मुलगा नाही'

गुडीमलकापूर परिसरात घडलेल्या या घटनेतील आरोपीचे नाव सलमान (वय 25) असे असून, पोलीस तपासात त्याच्या क्रूरतेमागचे कारण समोर आले आहे. घटनेच्या आदल्या रात्री दारूच्या नशेत सलमानचे त्याची पत्नी रुखसाना आणि आईसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. यानंतर रुखसाना आपल्या दोन मुलींना घेऊन माहेरी निघून गेली, मात्र चार वर्षांचा अरमान वडिलांसोबतच राहिला. सलमानला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि अरमान आपलाच मुलगा आहे की नाही, यावर त्याला शंका होती. याच संशयातून दुसऱ्या दिवशी भावाच्या घरी जाण्याच्या बहाण्याने तो मुलाला घेऊन बाहेर पडला आणि त्याने हे कृत्य केले.

हे ही वाचा : हॉटेलच्या खोलीत 22 वर्षीय मेकअप आर्टिस्टवर अत्याचार, रक्तस्त्राव अन् रक्तरंजित थरार

उपस्थितांनी दिला चोप

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पिलर क्रमांक 104 जवळ सलमानने आधी मुलाला एका चालत्या डीसीएम लॉरीखाली फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने मुलाला पायाला धरून त्याचे डोके अत्यंत निर्दयीपणे पिलरवर आपटले. हा थरार पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सलमानला पकडून चोप दिला, मात्र तो तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. स्थानिक नागरिकांनी तातडीने बेशुद्ध अवस्थेतील चिमुकल्याला उपचारासाठी निलोफर रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात मुलाच्या कवटीला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती, ज्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : बायको बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती, नवऱ्यानं पकडलं अन् भररस्त्यात राडा

सलमानला न्यायालयीन कोठडी

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी सलमानला अटक केली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सलमानची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, गोलकोंडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या हिंसक वागणुकीबाबत कुटुंबाने यापूर्वीही पोलिसांत तक्रार केली होती, परंतु समुपदेशनानंतरही त्याच्यात कोणताही बदल झाला नाही. मुलाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सुरुवातीला नोंदवलेल्या 'हत्येचा प्रयत्न' या गुन्ह्याला भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 अंतर्गत 'हत्येच्या' गुन्ह्यात रूपांतरित केले आहे. सलमानच्या आईनेही आपल्या मुलाच्या अमानुष कृत्याबद्दल संताप व्यक्त करत त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.