जालना : चेहरा, छाती, गळा, हात काहीच सोडलं नाही, प्रेमात पडल्याने 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
जालन्यात प्रेमसंबंधाच्या संशयातून 18 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जालना : चेहरा, छाती, गळा, हात काहीच सोडलं नाही,
प्रेमात पडल्याने 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
Jalna Crime, गौरव साळी : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रुई गाव पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरलं आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा खुनाची घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून 18 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलिसांनी चार आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत दोन आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले आहे. मृत तरुणाचे नाव राजेश विष्णू कोरकाने (वय 18 वर्ष रा. रुई ता. अंबड) असे आहे. हे आरोपी मुलीचे नातेवाईक असल्याचे समजते.
धारधार शस्त्राने केले सपासप वार
राजेश हा शेतकरी कुटुंबातील असून, आरोपींना त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्याच कारणावरून आरोपींनी कट रचून गावातील पडीत जागेवर राजेशला गाठले. यानंतर आरोपींनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने राजेशच्या चेहऱ्यावर, छातीवर, गळ्यावर आणि दोन्ही हातांवर सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत राजेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे रुई गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृताच्या नातेवाईक काशीबाई पंढरीनाथ कोरकाने यांच्या फिर्यादीवरून तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 3(5) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : मुंबई : पत्नी अन् तिच्या प्रियकराला घरी बोलावून फुल्ल दारु पाजली, अन् थंड डोक्याने मोठं कांड
दोन आरोपी ताब्यात
या प्रकरणातील आरोपींची नावे दत्ता शेषराव साळे, शुभम दत्ता साळे, करण दत्ता साळे आणि अभिषेक उर्फ मोन्या अशोक मुसळे अशी असून सर्व आरोपी रुई गावातीलच आहेत. घटनेनंतर तिर्थपुरी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत अवघ्या तासाभरात दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच सपोनि वैशाली पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांनीही घटनास्थळी भेट दिली.
हे ही वाचा : बायकोनं दारूत विष मिसळून नवऱ्याला संपवलं, त्यावरच लिहिलं पुस्तक
पोलीस बंदोबस्तात वाढ
मृतदेहाचे शवविच्छेदन सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा खुनाची घटना घडल्याने रुई गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









