'पप्पा खड्डा खांदत आहेत', मुलीचा आईला फोेन, अन् 3 फुट खाली सापडली मुलीची बॉडी

मुंबई तक

• 07:33 AM • 05 Sep 2026

Crime News : अमृतसरमध्ये चारित्र्यावर संशय घेत वडिलांनी 19 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर घरामागे तीन फूट खोल खड्डा खोदून मृतदेह पुरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'पप्पा खड्डा खांदत आहेत', मुलीचा आईला फोेन,

point

अन् 3 फुट खाली सापडली मुलीची बॉडी

Crime News : पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील मत्तेवाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत वडिलांनीच आपल्या 19 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने घराच्या मागे सुमारे तीन फूट खोल खड्डा खोदून मुलीचा मृतदेह पुरल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीची ओळख नवनीत कौर अशी झाली आहे. हत्येपूर्वी नवनीतने आईला फोन करून वडील घराबाहेर मोठा खड्डा खोदत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिचा फोन बंद येऊ लागला. बुधवारी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने संशयित ठिकाणी खोदकाम केले असता नवनीतचा कुजलेला मृतदेह सापडला.

हे वाचलं का?

हेही वाचा : किल्ल्यावर केक कापला, नंतर 3 चिमुकल्यांना खाली फेकलं अन् स्वत: मारली उडी, Gold मेडल Winner अश्विनीने का केलं असं?

पतीच्या या गोलमोल उत्तरांमुळे मुलीबाबत संशय वाढला

नवनीतची आई सरबजीत कौर हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कलह आणि पतीच्या रोजच्या भांडणांना कंटाळून ती 25 ऑगस्ट रोजी माहेरी गेली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी नवनीतने तिला फोन केला. यावेळी ती घाबरलेल्या अवस्थेत होती. वडील घराबाहेर मोठा खड्डा खांदत असल्याचे तिने आईला सांगितले. या संभाषणानंतर नवनीतशी सरबजीतचा संपर्क पूर्णपणे तुटला. मुलीबाबत पतीकडे विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करणारी उत्तरे दिली. नवनीतला सहा महिन्यांसाठी कुठेतरी बाहेर पाठवले असल्याचा दावा त्याने केला. मात्र पतीच्या या गोलमोल उत्तरांमुळे सरबजीतला मुलीबाबत संशय आला.

हेही वाचा : बारामती: 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीच्या छतावरून उडी, उपचारादरम्यान दुर्दैवी अंत

तीन फूट खोदल्यानंतर नवनीत कौरचा मृतदेह आढळला 

बुधवारी सरबजीत कौर मत्तेवाल येथील आपल्या घरी पोहोचली. नवनीतने ज्या ठिकाणी खड्डा खोदला जात असल्याचे सांगितले होते, त्या जागेची पाहणी केली असता तिथे ताजी खोदलेली माती दिसली. त्यामुळे तिचा संशय अधिकच बळावला आणि तिने तातडीने मत्तेवाल पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जेसीबीच्या मदतीने संशयित ठिकाणी खोदकाम सुरू केले. सुमारे तीन फूट खोदल्यानंतर नवनीत कौरचा मृतदेह आढळून आला. मुलीचा मृतदेह पाहताच सरबजीत कौर बेशुद्ध झाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.

सरबजीत कौरच्या म्हणण्यानुसार, तिच्या मोठ्या मुलीने सुमारे आठ महिन्यांपूर्वी आपल्या पसंतीने पळून जाऊन लग्न केले होते. या घटनेनंतर तिचा पती संतापलेला होता आणि तो धाकटी मुलगी नवनीत कौर हिच्यावरही संशय घेत होता. नवनीतचेही कोणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला होता. याच संशय आणि विक्षिप्तपणातून त्याने मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. मत्तेवाल पोलीस ठाण्याचे एसएचओ दलजीत सिंह यांनी सांगितले की, सरबजीत कौरच्या जबाबावरून आरोपी वडिलांविरोधात हत्येसह BNS मधील संबंधित कलमांनुसार आणि पुरावे लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी वडील फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांची पथके छापेमारी करत आहेत. आरोपीला अटक झाल्यानंतर आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हत्येची नेमकी पद्धत स्पष्ट होईल.