Bengaluru Crime News : बंगळुरूमध्ये चार महिन्यांच्या जुळ्या मुलींची हत्या केल्याच्या आरोपावरून 40 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींची हत्या केल्यानंतर महिलेने स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे तालाघट्टापुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेत मृत झालेल्या दोन्ही मुली चार महिन्यांच्या होत्या.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सातारा : वॉशरुममध्ये अश्लील शब्द, पालकांना बोलवण्याची चर्चा अन् तरुणीची तिसऱ्या मजल्यावरुन उडी
हार्मोनल असंतुलन अन् नैराश्य ..महिलेने उचललं भयंकर पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा देवी या महिलेवर प्रसूतीनंतर मानसिक उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना तिच्या वर्तनामागे प्रसूतीनंतरचे नैराश्य आणि बाळाच्या जन्मानंतर झालेल्या हार्मोनल असंतुलनाचा संबंध असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. उमा देवी या तिचे पती रामलिंगप्पा, जुळ्या मुली आणि सासूसोबत वजारहल्ली येथे राहत होत्या. रामलिंगप्पा हे रिअल इस्टेट व्यवसायात असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे 2002 मध्ये उमा देवी यांच्याशी लग्न झाले होते आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत होते.
हेही वाचा : डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज काढणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण, काय घडलं? VIDEO
मुलींबद्दलचा रस कमी झाला अन् थेट हत्या करुन आत्महत्या
लग्नानंतर त्यांना मूल नसल्याने त्यांनी आयव्हीएफ उपचार घेतले. त्यानंतर उमा देवी गर्भवती झाल्या आणि 5 मे रोजी त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रसूतीनंतर सुमारे दीड महिन्यांनी उमा देवी यांचा मुलींबद्दलचा रस कमी होऊ लागला. त्या मुलींना आश्रमात दाखल करण्याबाबत वारंवार बोलत असल्याचे पतीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर त्यांच्या वर्तनातही बदल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर राघवेंद्र हॉस्पिटल आणि NIMHANS येथे मानसोपचार सुरू होते. डॉक्टरांनी प्रसूतीनंतरचे नैराश्य आणि हार्मोनल असंतुलनामुळे त्यांचे वर्तन असल्याचे कुटुंबीयांना सांगितल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नमूद केले.
पोलिसांनी सांगितले की, 1 सप्टेंबरच्या दुपारी रामलिंगप्पा घरी परतले असता उमा देवी यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरवाजा उघडल्यानंतर त्या गळ्यात ओढणी बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. रामलिंगप्पा यांनी त्यांना वाचवले. त्याच खोलीत त्यांच्या चार महिन्यांच्या जुळ्या मुली मृतावस्थेत आढळल्या. शंकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मुलांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू बुडल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला. पतीने दिलेल्या तक्रारीत उमा देवी यांनी मुलींची हत्या केल्याचा आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे तालाघट्टापुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT












