lucknow Crime News : लखनौच्या मानकनगर परिसरातून धक्कादायक हत्या प्रकरण समोर आले आहे. 55 वर्षीय धीरज कुमार सोनकर याने 28 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर पूजा उर्फ परवीन हिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हत्येनंतर मृतदेह ई-रिक्षामध्ये ठेवून तो फेकण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र, काही पादचारी दिसताच आरोपी घाबरला आणि मृतदेह फुटपाथवरच सोडून ई-रिक्षातून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही तासांतच आरोपीला अटक केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई : सर्वांना सोडलं, शेवटी स्कूल बसमध्ये चिमुरडी एकटी राहिली, ड्रायव्हरने केला अत्याचार
दोघांमध्ये दीर्घकाळापासून संबंध, पण त्या मुद्द्यावरुन वाद पेटला अन्...
पोलिसांच्या माहितीनुसार, धीरज आणि पूजा गेल्या चार-पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि दोघांमध्ये दीर्घकाळापासून संबंध होते. पूजा अनेकदा स्लीपर ग्राउंड परिसरातील धीरजच्या ठिकाणी येऊन त्याच्यासोबत राहत होती. 30 ऑगस्टच्या रात्रीही दोघे एकत्र होते. याचदरम्यान पूजाने धीरजकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, आपल्याकडे पैसे नसल्याचे धीरजने सांगितले. नुकतेच कर्ज घेऊन ई-रिक्षा खरेदी केल्याने आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याचे त्याने सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद रात्रीपासून सकाळपर्यंत सुरू राहिला. पहाटे सुमारे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास पूजा घरी जाण्याचा हट्ट करू लागली. यावेळी तिने धीरजला वाईट परिणाम भोगण्याची धमकी दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
मृतदेह ई-रिक्षामध्ये ठेवून तो कॅनॉलच्या दिशेने निघाला, पण...
पोलिसांच्या चौकशीत धीरजने सांगितल्याप्रमाणे, धमकी दिल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने पूजाचा दुपट्टा घेत तिचा गळा आवळला. गळा आवळल्याने पूजाचा मृत्यू झाला. त्यानंतर धीरजसमोर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे आव्हान होते. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने आधी असा मार्ग शोधला जिथे सीसीटीव्ही कॅमेरे कमी असतील आणि आपल्याला कोणी पाहणार नाही, याची काळजी घेतली. त्यानंतर मृतदेह ई-रिक्षामध्ये ठेवून तो कॅनॉलच्या दिशेने निघाला. आरोपी डीआरएम पुलियाजवळ पोहोचला आणि मृतदेह कॅनॉलमध्ये फेकण्याची तयारी करत असतानाच काही पादचारी तिथून येताना दिसले. त्यामुळे तो घाबरला. लोकांनी आपल्याला मृतदेहासह पाहिल्यास आपण पकडले जाऊ, अशी भीती वाटल्याने त्याने मृतदेह कॅनॉलमध्ये फेकण्याचा निर्णय सोडला आणि तो फुटपाथवर ठेवून ई-रिक्षासह तिथून पळून गेला.
दरम्यान, पूजाचे वडील मुन्ना लाल मियां उर्फ टिंचू इस्लाम यांनी मानकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या मुलीची हत्या तिच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या धीरज कुमार सोनकरने केल्याचा आरोप केला आणि मृतदेह कॅनॉलजवळ फेकल्याचे सांगितले. तक्रार मिळताच मानकनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अजीत कुमार यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी उपलब्ध सुरागांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. अखेर आलमबागमधील शांतिपुरम येथील घरातून धीरज सोनकरला अटक करण्यात आली. पोलिसांच्या दाव्यानुसार, ही अटक घटनेनंतर सुमारे तीन तासांत करण्यात आली. आरोपीच्या मृतदेहावरील निशाणावरुन आरोपीने नेण्यासाठी वापरलेला ई-रिक्षाही पोलिसांनी जप्त केला. चौकशीत धीरजने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 50 हजार रुपयांवरून झालेला वाद हत्येपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले असून, आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












