Crime News , कुरनूल (आंध्र प्रदेश) : प्रेमसंबंधातील सूड उगवण्यासाठी एका महिलेने तिच्या एक्स प्रियकराच्या पत्नीला थेट HIV विषाणूचे इंजेक्शन दिल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी महिलेसह एकूण चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बी. बोया वसुंधरा (वय 34, रा. कुरनूल) असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्यासोबत कोंगे ज्योती (वय 40), अडोनी येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेली परिचारिका, तसेच ज्योतीची दोन मुले (वय 20 च्या आसपास) यांनाही अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना 24 जानेवारी रोजी अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
पीडित महिला ही कुरनूलमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ती वसुंधराच्या एकेकाळच्या प्रियकराची पत्नी आहे. पती-पत्नीमध्ये फूट पाडणे आणि वैयक्तिक सूड उगवणे, या हेतूने हा कट रचण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
अपघाताचा बनाव रचून हल्ला
पोलिस तपासानुसार, आरोपींनी पीडितेवर हल्ला करण्यासाठी रस्ते अपघाताचा बनाव रचला. 9 जानेवारी रोजी दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास पीडिता जेवणासाठी स्कूटरवरून घरी जात असताना, विनायक घाटाजवळील केसी कॅनॉल परिसरात दोन जणांनी दुचाकीवरून मुद्दाम तिला धडक दिली. यात ती रस्त्यावर कोसळली आणि जखमी झाली. अपघातानंतर आरोपी मदतीचा बहाणा करत तिच्याजवळ आले. तिला रिक्षामध्ये बसवण्याचा प्रयत्न करत असताना वसुंधराने तिच्या शरीरात HIV संक्रमित रक्ताचे इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे. मात्र पीडितेने आरडाओरड केल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
HIV संक्रमित रक्त कसे मिळवले?
तपासादरम्यान आरोपींनी सरकारी रुग्णालयातील HIV रुग्णांकडून ‘संशोधनासाठी रक्तनमुने हवेत’ असा खोटा बहाणा करून संक्रमित रक्त मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हे रक्त आरोपींनी रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, पोलिसांनी HIV संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, HIV विषाणू काही दिवस रेफ्रिजरेटरमध्ये जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका अत्यल्प असून, केवळ परकीय घटक शरीरात प्रवेश केल्याचा वैद्यकीय धोका असल्याचे सांगण्यात आले.
पीडितेची प्रकृती स्थिर
घटनेनंतर पीडितेला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. स्वतः डॉक्टर असल्यामुळे तिने आवश्यक चाचण्या आणि औषधोपचार तत्काळ सुरू केले. इतर डॉक्टरांनी तिला ‘म्युटेशन टाइम’ लक्षात घेऊन तीन आठवड्यांनंतर पुन्हा तपासणीस येण्याचा सल्ला दिला आहे. पीडितेचे पती, जे स्वतः डॉक्टर आहेत, यांनी 10 जानेवारी रोजी कुरनूल टाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











