Crime News : नराधम डॉक्टर सुलेमान आणि त्यांची पत्नी आबिदा हिने एका हतबल तरुणीचा विश्वासघात करत तिला नरकयातना दिल्याचा आरोप झाला आहे. पीडित तरुणीचे वडील परदेशात नोकरीला असल्याने, डॉक्टर दाम्पत्याने तिच्या आईची दिशाभूल करून तरुणीला मदतीसाठी आपल्या घरी बोलावले होते. मात्र, ज्या हातांनी रुग्णांना जीवदान द्यायचे, त्याच हातांनी एका निरागस मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात डॉक्टरच्या पत्नीनेही आपल्या पतीला साथ दिल्याने या गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर बनले असून, वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील मिमलाना रोड परिसरातून ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT
इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन छळ
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, एके दिवशी कामावर असताना तिची प्रकृती खालावली. याचाच फायदा घेत डॉक्टर सुलेमानने तिला उपचाराच्या नावाखाली एक इंजेक्शन दिले आणि औषध पाजले. यामुळे ती तरुणी पूर्णपणे बेशुद्ध पडली. साधारण तीन तासांनंतर जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा तिच्या शरीरावर कपडे नव्हते आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे तिला जाणवले. जेव्हा तिने डॉक्टरला जाब विचारला, तेव्हा आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे दाखवून तिला धमकावले. धक्कादायक बाब म्हणजे, हे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन डॉक्टरने पुढील 14 महिने तिच्यावर सतत अत्याचार केले. या संपूर्ण कालावधीत डॉक्टरची पत्नी आबिदा हिने पीडितेची मदत करण्याऐवजी पतीला साथ दिली आणि पीडितेचे मानसिक खच्चीकरण केले.
हेही वाचा : Raj Thackeray: 'याचा त्रास आपल्याला निश्चित होणार...', राज ठाकरेंनी ओळखला 'तो' धोका?
वडिलांच्या परतीनंतर वाचा फुटली अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका
दीर्घकाळ हा छळ सोसल्यानंतर, जेव्हा पीडितेचे वडील परदेशातून मायदेशी परतले, तेव्हा तिने धैर्याने सर्व आपबिती त्यांना सांगितली. यानंतर पीडितेने वडिलांसह कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत ढिसाळ भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला ताब्यात तर घेतले, पण अवघ्या काही तासांतच त्याची सुटका केली. पोलिसांच्या या भूमिकेमुळे हतबल झालेल्या पीडितेने एक व्हिडिओ बनवून आत्महत्येची धमकी दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आणि वरिष्ठ अधिकारी ॲक्शन मोडमध्ये आले. त्यानंतर एसएसपींनी या प्रकरणाचा तपास तात्काळ 'एसपी क्राईम' यांच्याकडे सोपवला असून, कसून चौकशीचे आदेश दिले आहेत.
एसपी क्राईम इंदू सिद्धार्थ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. तपास पथकामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला असून, पीडितेचा जबाब आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. पीडितेने लावलेले आरोप अत्यंत गंभीर असून, अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या डॉक्टर आणि त्याच्या पत्नीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. 14 महिन्यांपासून सुरू असलेल्या या पाशवी अत्याचाराचा निकाल आता पोलीस तपासावर अवलंबून आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी सामाजिक स्तरावरूनही मागणी जोर धरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











