Raj Thackeray: 'याचा त्रास आपल्याला निश्चित होणार...', राज ठाकरेंनी ओळखला 'तो' धोका?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील भाषणात इराण हल्ल्यावर भाष्य करत थेट पंतप्रधान मोदींना एक सल्ला दिला आहे. पाहा आपल्या भाषणात ते नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (19 मार्च) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात इराण-इस्रायल युद्धावर जोरदार भाष्य करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खडे बोल सुनावले. “इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता. त्या इराणवर ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, ते पाहता आपण इराणला साथ द्यायला हवी होती,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. देशात एलपीजी गॅसच्या भीषण टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला इराण युद्धाला जबाबदार धरत भविष्यात भारताला याचा निश्चित त्रास होणार असल्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी मध्य पूर्वातील युद्धावर वक्तव्य केलं. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि खामेनेई कुटुंबातील सदस्यही मारले गेले. त्यानंतर इराणने इस्रायल आणि आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. दक्षिण पार्स गॅस फील्डसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले झाल्याने जगभरातील ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला. याचा थेट परिणाम भारतावर झाला आहे. पण आतापर्यंत इराण अनेकदा भारताच्या बाजूने असतानाही अशा परिस्थितीत भारताने इराणला पाठिंबा न दिल्याने राज ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली.
'आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती...', पाहा राज ठाकरे काय म्हणाले
राज ठाकरे म्हणाले, “देशातही आज धाकधूक सुरू आहे, भीषण परिस्थिती आहे. गॅस मिळत नाहीये. नेहमी नॉर्मलवर असणारी लोकं गॅसवर आहेत.“ इराणकडून भारताला रुपयांमध्ये तेल पुरवठा होत असल्याची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले की, “आपल्या देशामध्ये येणारं तेल हे इराणमधून येतं. ते आपल्याला रुपयामध्ये देतात, देत आले. पण खामेनेईंच्या मृत्यूनंतर आणि इराणवर हल्ले झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ना निषेधाचे विधान केले, ना श्रद्धांजलीसाठी तातडीने प्रतिक्रिया दिली. काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांकडून राहून गेल्या,” असे ठाकरे म्हणाले. “इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही. हल्ल्यावर कुठचं विधान केलं नाही,” अशी टीका त्यांनी केली.
हे ही वाचा>> 'सरकारने टेलिव्हिजन वाल्यांची वाट लावली, सतत दबाव या बातम्या नको...' राज ठाकरेंनी गाजवली सभा, सरकारला धारेवर धरलं
इराणने जम्मू-काश्मीर मुद्द्यावर भारताला पाठिंबा दिल्याची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले, “जो देश आजपर्यंत जम्मू-काश्मिरच्या प्रश्नावर देखील आपल्या पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला.. त्यांच्या अडचणीच्या काळात आपण उभे राहिलो नाही. याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला.”










